शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाला आगामी महापालिका निवडणुकीपूर्वीच मुंबईमधून पुन्हा एकदा मोठा धक्का बसला. विनायक राऊत यांचे निकटवर्तीय राजू नाईक आणि दिनेश कुबल यांनी ठाण्यात धनुष्यबाण हातात घेण्याचे ठरवले. एकनाथ शिंदे यांनी दोन्ही नेत्यांचे स्वागत केले.
दिनेश कुबल हे कलीना वॉर्ड क्रमांक ८९ चे विद्यमान नगरसेवक असून असंख्य कार्यकर्त्यांसोबत त्यांनी आज शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. सोबतच रवींद्र घुसळकर, राजू शेट्टी, विशाल कनावजे या राष्ट्रवादी शरद पवार पक्षातील कार्यकर्त्यांनी देखील शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला मुंबईत मोठा धक्का समजला जातोय.
advertisement
शिवसेना-मनसेत प्रभागांसाठी रस्सीखेच
ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मराठीबहुल भागामध्ये मनसे आणि ठाकरे गटात जागा वाटपाचा तिढा होता. चर्चेअंती जागा वाटपाचा तिढा सुटल्याचे सांगितले गेले. मात्र, मनसेसाठी सोडलेल्या वॉर्डांवर ठाकरे गटाच्या इच्छुकांनी दावा सांगितला आहे.
ठाकरे गट आणि मनसेच्या जागा वाटपाच्या चर्चेत दादर-माहीम परिसरातील जागा कळीच्या ठरल्या. शिवसेना भवन, राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेले 'शिवतीर्थ' अशी महत्त्वाची ठिकाणे याच भागात येतात. जागा वाटपात शिवसेना ठाकरे गटाच्या वाटेला या परिसरातील ४ जागा आल्या असून दोन जागांवर मनसेचे उमेदवार असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मनसेच्या वाटेला १९० आणि १९२ हे दोन मतदारसंघ सुटले आहेत. मात्र, त्यावरून आता ठाकरे बंधूंची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत.
