मनोज जरांगे पाटील एबीपी माझाशी बोलत होते. यावेळी या सीसीटीव्हीवर बोलताना जरांगे म्हणाले की, या मधल्या एकाही आरोपीला सोडू नका. खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबियांवर संकट येऊ शकत. ते दहशत सु्द्धा पसरवून शकतात. देशमुख कुटुंबियांचा सुद्धा मर्डर करतील, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच आताच तर सिद्धच झालं आहे या सीसीटीव्हीमुळे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी विशेष लक्ष देऊन या लोकाना सुटूच दिलं नाही पाहिजे, अशी मागणी जरांगे यांनी केली.
advertisement
जरांगे पुढे म्हणाले, खून करण्या अगोदरच फुटेज देखील यांच सापडलं आहे. खुन झाला तरी हा व्यक्ती इथेच कुठेतरी बसून होता. केजला म्हणा किंवा इकडे तिकडे आजूबाजूला होता. याच सुद्धा फुटेज तपास यंत्रणेने बाहेर काढले पाहिजे. तसेच खुन करणारे आणि खंडणीतले आरोपी यांची पाठराखण करणारा मुख्य सुत्रधार आहे. याला मुख्य आरोपी करा. आणि यांना सगळ्यांना पाठबळ देणारा सरकारमधला मंत्री (धनंजय मुंडे) पण हा सु्द्धा सुटका कामा नये, सगळे सहआरोपी करा, अशी मागणी जरांगे यांनी यावेळी केली.
सीसीटीव्हीत काय?
विष्णू चाटे याच्या कार्यालयातील हे सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासात समोर आले आहे. ज्या दिवशी आवादा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली त्याच दिवशी सर्व आरोपी एकत्र आल्याचे व्हिडीओतून स्पष्ट होत आहे. 29 नोव्हेंबर 2024 चे सीसीटीव्ही फुटेज असल्याचे सांगितले जात आहे. या सीसीटीव्हीच्या रुपाने खंडणी प्रकरणातला सर्वांत मोठा पुरावा मिळाल्याचे बोलले जाते.
विष्णु चाटे याच्या केज शहरातील कार्यालयात वाल्मिक कराड आला होता. खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड याने विष्णू चाटे याच्या मोबाईलवरून आवादा कंपनीच्या व्यवस्थापकाला दोन कोटीची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्यामुळे खंडणी प्रकरणात हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा समजला जात आहे.समोर आलेल्या व्हिडीओत वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि इतर आरोपी एकत्र असल्याचे दिसून येतात. दुपारी १२ वाजताच्या दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. विष्णू चाटे याच्या कार्यालयातील हे सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासांत समोर आले आहे.
