अपघाताची घटना अल्लीपूर परिसरात घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेट्रोल पंपावरून निघालेला एक ट्रक अचानक भरधाव वेगाने पुढे आला आणि समोरून येणाऱ्या एसटी बसला जोरदार धडक दिली. धडक एवढी भीषण होती की बसच्या पुढच्या भागाचा चुराडा झाला. बसमधील प्रवाशांचा आक्रोशावरून अपघाताचे भीषण स्वरूप स्पष्ट होत होते.
घटनेची माहिती मिळताच अल्लीपूर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना बाहेर काढून स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात हलवण्यात आले. अपघातानंतर ट्रक चालक वाहन सोडून पळून गेला असून पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात आहे.
advertisement
या घटनेमुळे वर्धा-हिंगणघाट मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केली होती, तर अपघाताच्या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस दाखल झाले होते.
ट्रक चालकाच्या निष्काळजीपणामुळे एसटी प्रवाशांचे जीव धोक्यात आले आहेत. जखमी प्रवाशांवर सेवाग्राम रुग्णालयात उपचार सुरू असून लवकरच प्रवाशांच्या तब्येतीबाबत माहिती देण्यात येईल, असे रुग्णालय प्रशासनाने सांगितले.