पुलगावात ठाकरे गटाकडून बसची तोडफोड
निकालानंतर वर्धा जिल्ह्यात ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पुलगावात ठाकरे गटाकडून बसची तोडफोड करण्यात आली. ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख आशिष पांडे यांच्यासह कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली. बसवर दगडफेक करत ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. पुलगावच्या स्टेशन चौक परिसरात विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आले. बसला थांबवत त्यावर दगडफेक करत बसची काच फोडली. बसच्या तोडफोडीनंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते घटनास्थळावरून पसार झाले. घटनेनंतर पुलगावच्या स्टेशन चौक परिसरात काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाविरोधात निकाल दिल्यामुळे संतप्त शिवसैनिकांचं आंदोलन. ही बस पुलगाव बस स्थानकावरून आगारामध्ये जात असल्याने बसमध्ये कोणतेही प्रवासी नव्हते. या घटनेनंतर पुलगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाली असून वाहतूक सुरळीत करत आहे.
advertisement
संभाजीनगरमध्ये राडा
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजून निकाल दिल्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला आहे. एकीकडे शिंदे गट आनंदोत्सव साजरा करत आहे, तर दुसरीकडे ठाकरे गटाकडून या निर्णयाविरोधात आंदोलन केलं जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये अचानक दोन्ही गट आमनेसामने आले. तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. मात्र, त्यानंतरही कुणीही मागे घ्यायला तयार होईना. दोन्ही बाजूने प्रचंड घोषणाबाजी सुरू होती. अखेर पोलिसांनी ठाकरे गटाच्या लोकांना ताब्यात घेतलं. माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा मुलगा हृषीकेश खैरे यांनाही ताब्यात घेतलं आहे. चार जणांना पोलिसांनी उचललं आहे. पोलिसांनी जमाव पांगवल्यानंतर काही प्रमाणात तणाव निवळला.
वाचा - '...म्हणून ठाकरेंच्या आमदारांना अपात्र केलं नाही', नार्वेकरांनी सांगितलं कारण
काय आहे नेमकं प्रकरण?
शिवसेनेत फूट पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले. शिवसेनेतील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे राज्यातील तत्कालीन ठाकरे सरकार अल्पमतात आलं. सरकार अल्पमतात असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर व्हीपच उल्लंघन केल्यामुळे शिंदे यांच्यासह त्यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांना अपात्र करावे यासाठी ठाकरे गटाकडून सुप्रीम कोर्टात धाव घेण्यात आली. त्यानंतर शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा चेंडू विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात आला. आज अखेर यावर विधानसभा अध्यक्षांनी निकाल दिला आहे.
