Success Story : 15 हजार पगाराची नोकरी सोडली, भाऊ-बहिणीने सुरू केला कपडे व्यवसाय, महिन्याला 4 लाख कमाई
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
दादरमधील भाऊ-बहिणीनेही स्वतःचा कपड्यांचा व्यवसाय सुरू करत कमी कालावधीत लाखोंची उलाढाल करण्याची कामगिरी केली आहे.
मुंबई : व्यवसाय करणं हे आजच्या तरुणाईचे एक मजबूत पाऊल ठरत असून, अनेक तरुण नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय उभा करण्याकडे वळताना दिसत आहेत. अडचणी, चढ-उतार असूनही जिद्दीने पुढे जाण्याची तयारी हीच त्यांची ताकद ठरत आहे. कधी मित्र-मित्र, कधी नवरा-बायको, तर कधी कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन व्यवसाय सुरू करत आहेत. याच धर्तीवर दादरमधील भाऊ-बहिणीनेही स्वतःचा कपड्यांचा व्यवसाय सुरू करत कमी कालावधीत लाखोंची उलाढाल करण्याची कामगिरी केली आहे.
आशितोष सावंत आणि त्याची बहीण तृप्ती सागर सावंत-तोटे यांनी मिळून दादर स्टेशनजवळ उत्सव या नावाने कपड्यांचे दुकान सुरू केले आहे. सुरुवातीला त्यांनी स्वतःच्या बचतीतून आणि पैसे जमा करून या व्यवसायाची सुरुवात केली. विशेष म्हणजे, त्यांच्या कुटुंबात आधीपासून व्यवसायाची पार्श्वभूमी नव्हती. त्यांचे वडील पोलीस खात्यात नोकरीला होते, त्यामुळे घरात नोकरीकडेच कल असलेली पारंपरिक पार्श्वभूमी होती.
advertisement
आशितोष सावंत हा 2015-16 दरम्यान ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत होता. मात्र, कमी पगार आणि मर्यादित संधी यामुळे त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. कोरोना काळात त्याने ऑनलाइन माध्यमातून कपड्यांची वेबसाईट सुरू केली आणि स्वतःचा ब्रँड तयार केला. या ऑनलाइन व्यवसायाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर त्याने ऑफलाइन दुकान सुरू करण्याचा विचार केला.
advertisement
त्यानंतर त्याने आपली बहीण तृप्तीला या व्यवसायात सहभागी होण्याची ऑफर दिली. तृप्ती ही लग्नाआधी अनेक वर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करत होती. लग्नानंतर आणि मुलाच्या जन्मानंतर ती अनेक वर्षे घरातच होती. तिचा सात वर्षांचा मुलगा असून, पुन्हा कामात सक्रिय होणे तिच्यासाठी मोठे पाऊल होते. तरीही तिने भावासोबत व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला.
advertisement
सुरुवातीच्या काळात दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तृप्तीसाठी घरातील जबाबदाऱ्या सांभाळत पूर्णवेळ दुकानात काम करणे हे नवीन होते, तर आशितोषसाठी ऑनलाइन व्यवसायातून ऑफलाइन दुकान व्यवस्थापनाकडे वळणे ही मोठी जबाबदारी होती. मात्र, काही काळातच त्यांनी या सगळ्याशी जुळवून घेत व्यवसाय स्थिर केला.
आज त्यांच्या उत्सव दुकानाला एक वर्ष पूर्ण झाले असून, या व्यवसायातून त्यांना चांगला नफा मिळत आहे. पूर्वी 10 ते 15 हजार रुपयांवर नोकरी करणारा आशितोष सावंत आता या व्यवसायातून दरमहा सुमारे 3 ते 4 लाख रुपयांची कमाई करत आहे. दादरमधील या भाऊ-बहिणींचा प्रवास इतर तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 19, 2026 4:37 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : 15 हजार पगाराची नोकरी सोडली, भाऊ-बहिणीने सुरू केला कपडे व्यवसाय, महिन्याला 4 लाख कमाई









