खरं तर ग्रामीण भागात अशा अनेक घटना घडत असतात. कारण जिल्हा परिषद शाळेत अनेक वर्ष शिक्षक विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देऊन घडवत असतात.त्यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांचा लळाच लागतो. असाच लळा वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी येथील पी.एम.श्री.जिल्हा परिषद वरिष्ठ केंद्रातील विद्यार्थ्यांचा शिक्षकांशी लागला होता. कारण तब्बल 7 वर्षानंतर शिक्षक उमेश गहूले,संतोष मुळे आणि शिक्षिका उषा गवई यांची आज बदली झाली होती.त्यामुळे या शिक्षकांचा आजचा शेवटचा दिवस होता.त्यामुळे आपल्या आवडत्या शिक्षकांना निरोप देताना विद्यार्थ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
advertisement
कोठारीच्या या जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी या शिक्षकांनी मोठे परिश्रम घेतल्याने शिक्षणाचा दर्जा ही उंचावला होता.मात्र आज त्यांची बदली झाल्याने त्यांना निरोप देताना विद्यार्थ्यांनी चक्क शाळेचे गेटच अडवून धरला होता.तसेच यावेळी विद्यार्थी ढसा ढसा रडले होते.
सर,मॅडम तुम्ही जाऊ नका असा हट्ट धरून थांबण्याची विनंती करत त्यांनी गेटच्या समोर घेराव घातला व त्यांना शाळे बाहेर जाण्यापासून रोखले.त्याच वेळी बदली झालेले शिक्षक गेट उघडायला गेले मात्र विद्यार्थ्यांनी नकार दिल्याने शाळेतील वातावरण आणखीच भावनिक झाले होते.यावेळी मुख्याध्यापक तसेच इतर सहकारी शिक्षकांना ही गहिवरून आले होते.
प्रेमळ,कर्तव्यनिष्ठ आणि आदर्श शिक्षक आपल्या गावातील जिल्हा परिषद शाळा सोडून जात असल्याने संपूर्ण गावकरी ही भावुक झाले होते.या जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा उंचावणाऱ्या अशा शिक्षकांची बदली रद्द करावी अशी मागणी सरपंच,पोलीस पाटील तसेच ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.