या सगळ्यामुळे आता पावसाचा जोर ओसरला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भाग वगळता राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. स्कायमेटने दिलेल्या माहितीनुसार, हरियाणा आणि उत्तर प्रदेशच्या परिसरात असलेला सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती आता बिहारच्या दिशेने पुढे सरकली आहे. याचाच परिणाम महाराष्ट्रातील हवामानावर होईल.
महाराष्ट्रात उकाडा वाढणार
कोकण पट्ट्यात कमालीची उष्णता वाढणार आहे. दमट आणि उष्ण हवामानामुळे हैराण होऊ शकतात. रायगड, रत्नागिरी, ठाणे, मुंबई आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. या भागात उष्ण वारे वाहणार आहेत. तर लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस राहणार आहे काही ठिकाणी गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाऱ्याचा वेश ताशी 50 किमीच्या आसपास असेल.
advertisement
महाराष्ट्रात पावसाने कुठे किती नुकसान?
पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील मलठण परिसराला सलग दोन दिवस गारपिटीसह अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. त्यामुळे गहू, कांदा यांसह तरकारी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. काढणीला आलेला गहू भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. वाशिमच्या मानोरा शहरासह विठोली,कारखेडा परिसराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलं.
गारपिटीमुळे काढणीला आलेला हरभरा, गहू, हळद आणि बिजवाई कांद्याला फटका बसला. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून तातडीने मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. नंदुरबार जिल्ह्यातल्या धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागांना अवकाळीचा तडाखा बसला. गारपिटीचा आंब्याला फटका बसला. गारपिटीमुळे आंब्याचा मोहोर गळून पडला त्यामुळे आंब्याच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे.
अकोल्याच्या अकोट तालुक्यातील सावरा, आसेगाव बाजार आणि मंचनपूर परिसरात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. गारपिटीमुळे कांदा, ज्वारी, गहू, हरभरा, टरबूज, केळी यासह आंब्याचं मोठं नुकसान झालं आहे. नांदेड जिल्ह्यात अस्मानी संकटाने शेतकऱ्याच्या डोळ्यात अश्रू आणले. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. या अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्याला बसला. गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे गहू,आंबा, टरबूज,केळी आणि हळदीचं नुकसान झालं आहे.
२४ तासांत बदललं हवामान
गेल्या २४ तासांत विदर्भातील काही जिल्ह्यांत पाऊस झाला असला, तरी आज दुपारनंतर ही स्थिती बदलली आहे. आता पावसाचा हा जोर उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडच्या दिशेने सरकत आहे. पाऊस जरी थांबला असला, तरी महाराष्ट्रात थंडीची एक छोटी लाट येण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे पंजाब, हरियाणा आणि राजस्थानसोबतच महाराष्ट्रातील तापमानातही घट होऊ शकते. विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात रात्रीच्या तापमानात मोठी घट होऊन गारठा जाणवेल. २२ आणि २३ मार्च दरम्यान किमान तापमानात २ ते ३ अंशांची घसरण होण्याची शक्यता आहे.
