राज्यात मका वितरणाचा निर्णय का?
राज्यातील काही भागांत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर मका उत्पादन घेतले आहे. उत्पादन वाढल्यामुळे शेतमालाला योग्य बाजारभाव मिळावा आणि साठवणुकीचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी शासनाने रेशन व्यवस्थेत मक्याचा समावेश करण्याचा विचार केला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला वापर मिळेल, असा सरकारचा अंदाज आहे. मात्र, हा निर्णय सर्व जिल्ह्यांना लागू नसून, ज्या भागांत मक्याची उपलब्धता अधिक आहे, तेथेच अंमलबजावणी केली जात आहे.
advertisement
पुणे जिल्ह्यात संभ्रम, पण स्पष्ट भूमिका
पुणे जिल्ह्यात रेशनवर तांदूळ बंद होणार, अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. अनेक लाभार्थ्यांनी रेशन दुकानांत चौकशी सुरू केली होती. अखेर जिल्हा प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आले की, पुणे जिल्ह्यासाठी सध्या तरी मका वितरणाचे कोणतेही आदेश आलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व रेशन दुकानांतून गहू आणि तांदूळ पूर्वीप्रमाणेच मिळणार आहेत.
घरात आधीच मका, पुन्हा रेशनवर मका?
ज्या जिल्ह्यांत मका वाटप सुरू झाले आहे, तेथील परिस्थिती वेगळी आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात मका उभा आहे, तर काहींच्या घरात आधीच मक्याच्या थप्प्या साठवलेल्या आहेत. अशा वेळी रेशनवरही मका मिळाल्यास त्याचा वापर कसा करायचा, असा प्रश्न लाभार्थ्यांपुढे उभा राहिला आहे. “घरात आधीच मका आहे, आता तांदळाऐवजी पुन्हा मका मिळाला तर तो खाणे अवघड होईल,” अशी भावना काही ठिकाणी व्यक्त केली जात आहे.
‘आम्हाला तांदूळच हवा’ लाभार्थ्यांची भूमिका
रेशनवरील तांदूळ हा गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या रोजच्या आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. भात, वरण, भाजी हा अनेक घरांचा मुख्य जेवणाचा प्रकार आहे. त्यामुळे तांदळाऐवजी मका देण्याच्या निर्णयाला काही जिल्ह्यांत विरोध होत आहे. “मका खाणे सर्वांना जमत नाही, आमचा तांदूळ बंद करू नका,” अशी स्पष्ट मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.
पुणे जिल्ह्यात धान्यवाटप कसे असेल?
प्रशासनाच्या माहितीनुसार पुणे जिल्ह्यात सध्या तरी कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे रेशन दुकानांतून गहू आणि तांदळाचे वितरण सुरळीत सुरू राहील. कार्डधारकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
कार्डधारकांना किती धान्य मिळते?
प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रति सदस्य दरमहा ३ किलो गहू आणि २ किलो तांदूळ, असे एकूण ५ किलो धान्य दिले जाते. तर अंत्योदय योजनेतील कुटुंबांना प्रत्येक कार्डावर दरमहा २१ किलो गहू आणि १४ किलो तांदूळ मिळतो. पुणे जिल्ह्यात हीच व्यवस्था पुढेही कायम राहणार असल्याने लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
