पुण्यात पत्रकार परिषद घेऊन अर्ज माघारी घेण्यामागची कारणे पूजा मोरे यांनी सांगितली. माझ्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ यांच्या अंगावर शिंतोडे उडायला नको. किंबहुना माझ्या उमेदवारीमुळे त्यांच्यावर टीका होत असेल तर मला आवडणार नाही, त्यामुळे मी अर्ज मागे घेतल्याचे पूजा मोरे यांनी सांगितले.
पूजा मोरे-जाधव कोण आहेत?
पूजा मोरे जाधव या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातल्या आहेत. घरची परिस्थिती अगदी जेमतेम. कष्ट करेल तेव्हा खाईल, अशी अवस्था. शेतकऱ्याची लेक म्हणून त्यांनी बापाचे कष्ट पाहिले. शेतकऱ्याच्या वेदनेला वाचा फोडण्यासाठी चळवळीत त्या काम करू लागल्या. अगदी तरुण वयात त्यांनी पंचायत समितीची निवडणूक लढवली. २०१७ सालच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत त्यांनी राज्यातील सर्वात तरूण पंचायत समितीच्या सदस्या म्हणून निवडून येण्याचा मान मिळवला. त्यानंतर त्यांनी शेतकरी प्रश्नांवर अत्यंत आक्रमकपणे काम करायला सुरुवात केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून दरम्यानच्या काळात राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात त्यांनी अनेक शेतकरी आंदोलने केली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पीकविमा आणि कर्जमाफीवरून त्यांनी महाजनादेश यात्रेला तीव्र विरोध केला होता. त्यानंतर त्यांनी राजू शेट्टी यांची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तरूण नेतृत्व, शेतकऱ्यांचा आवाज म्हणून राष्ट्रवादीने त्यांना अनेक ठिकाणी भाषणांची संधी दिली, पूजा मोरे यांनीही संधीचे सोने केले. सरकारची शेतकरी धोरणाची चिरफाड करून त्या प्रत्येक सभेत टाळ्या मिळवायच्या.
advertisement
मात्र २०२४ विधानसभेला पूजा मोरे यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वातील स्वराज्य पक्षाकडून गेवराई विधानसभा लढली. पवार-पंडित यांच्या वादात पूजा मोरे यांनी प्रचारात आघाडी घेऊन निवडणूक फिरवण्याचा प्रयत्न केला. पण अंतिमत: निवडणूक निकालात त्यांचा पराभव झाला.
मराठा चळवळीतून समाजकारणात पाऊल
त्याआधी त्यांनी मराठा आरक्षण चळवळीच्या माध्यमातून नेतृत्वाची छाप सोडली. खरे तर मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून त्यांची समाजकारण-राजकारणाची सुरुवात झाली असे म्हणता येईल. मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाचे प्रतिनिधित्व त्यांनी केले. यावेळी केलेल्या भाषणाने त्यांना राज्यभर प्रसिद्धी मिळाली.
गेली वर्षभर पुणे महापालिकेची तयारी
पूजा मोरे यांचा विवाह गतवर्षी धनंजय जाधव यांच्याशी झाला. त्यानंतर त्या पुणे शहरात स्थलांतरित झाल्या. प्रभाग क्रमांक एक मधून त्यांनी महापालिकेची तयारी सुरू केली. प्रभागातील लोकांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करून त्यांनी वातावरण निर्मिती केली. आषाढात मटन वाटप करून त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या. एकंदर गेल्या वर्षभरापासून त्या महापालिकेची तयारी करीत होत्या.
असे असले तरी त्यांच्या सतत या पक्षातून त्या पक्षातल्या प्रवासावर अनेक जण नाराजी व्यक्त करतात. शेतकरी चळवळीतून पुढे येऊन हिंदुत्ववादी भाजपपर्यंतचा प्रवास त्यांनी केल्याने समाज माध्यमांवर टीकाही होते आहे. दुसऱ्या बाजूला हिंदुत्वाच्या विचारांशी प्रामाणिक नाही म्हणत भाजप-संघ कार्यकर्तेही पूजा मोरे जाधव यांना लक्ष्य करीत आहेत.
