18 फेब्रवारी 2026 रोजी उगाव परिसरातून शादाब रज्जाक तांबोळी हा बेपत्ता झाल्याची तक्रार निफाड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. 22 फेब्रवारी 2026 रोजी सकाळी चांदवड तालुक्यातील परसुल गावच्या शिवारातील परसुली-चिंचोली नदीच्या पुलाखाली पाण्यात एका इसमाचा मृतदेह आढळून आला. अज्ञात आरोपींनी त्या इसमाचे दोन्ही हात नायलॉनच्या दोरीने बांधून, तोंडाला कपडा बांधून तसेच कंबरेला आणि मांडीला दोरीने डंबेल्स बार बांधून नदीत फेकून दिल्याचे आढळून आले. चांदवड पोलीस ठाण्या खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपासात मृत व्यक्त्ती ही निफाड पोलीस ठाण्यातील मिसिंगमधील युवक शादाब तांबोळी असल्याचे स्पष्ट झाले.
advertisement
सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवहाराचा बहाणा करत केली फसवणूक
तपासादरम्यान मयताची पत्नी मुस्कान शादाब तांबोळी हिचे ऋषभ मनोज वर्मा (रा. मनमाड) याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. दोघांना लग्न करायचे असल्याने त्यांनी मयताचा मेहुणा शाहरूख शफिक शेख याच्यासह इतर साथीदाराच्या मदतीने कट रचला. सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवहाराचा बहाणा करून शादाब तांबोळी याला मनमाड-मालेगाव रोडवरील बंद पडलेल्या पोल्ट्री फार्मवर बोलावण्यात आले. तेथे त्याचे हात-पाय नायलॉनच्या दोरीने बांधून व तोंडाला कपडा बांधून त्याचा खून करण्यात आला त्यानंतर मृतदेहाला डंबेल्स बार बांधुन चादवङ-निफाड रोडवरील परसुल शिवारातील नदीच्या पुलाखाली पाण्यात फेकून दिल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.
सात जणांना अटक
या प्रकरणात पोलिसांनी ऋषभ मनोज वर्मा (वय 23, रा. चांदवड रोड, मनमाड), शाहरूख शफिक शेख (वय 21., रा. मालगाव नाका, मनमाड -मयताचा मेहुणा), युवराज विजय थोरात (वय 19 रा.भीमनगर, मालेगाव), सलीम साबीर शेख (वय 28, रा. आझादनगर, मालेगाव), आर्यन सुंदर जिनवाल (वय 19, रा. भीमनगर, मालेगाव) , शेख एजाज शेख रियाज (वय 29., रा. आंबेडकर नगर मनमाड) मुस्कान शादाब तांबोळी (वय 24, रा.उगाव, ता. निफाड - मयताची पत्नी) या आरोपीना चांदवड पोलीस ठाण्यातील दाखल खनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास वाघ याच्या पथकाकडू्न सुरू आहे
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र मगर, चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ. निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव याच्यासह सपोनि नितीन रणदिवे, पोउनि प्रकाश भालेराव सपोउनि नवनाथ सानप, पोहवा सुधाकर बागुल, प्रशांत पाटील. हेमंत गिलबिले. श्रीकांत गारंगे ,ज्ञानेश्वर सानप, सचिन वराडे, विशाल गोसावी संदीप राठोड, प्रदीप बहिरम, नितीन गांगर्डे, प्रविण गांगुर्डे, किशोर बोडके आदींच्या पथकाने केली
