ही घटना उदगीर शहरातील पारकट्टी गल्ली भागात घडली. या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलिसांनी पत्नीसह तिच्या प्रियकराला अटक केली. पण ऑटोचालकासह अन्य दोघे आरोपी फरार आहेत. हनुमंत शरणप्पा जनवाडे असं हत्या झालेल्या ४० वर्षीय पतीचं नाव आहे. तर पूजा जनवाडे आणि तिचा प्रियकर सुनील उर्फ पिंटू पाटील असं अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत.
advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ६:३० या वेळेत हनुमंत यांची पत्नी पूजा जनवाडे आणि तिचा प्रियकर सुनील उर्फ पिंटू पाटील यांनी त्यांच्या अनैतिक संबंधांत अडथळा ठरत असल्याने कट रचून त्यांची हत्या केली. यासाठी त्यांनी आणखी तीन अनोळखी पुरुषांची मदत घेतली. मृत हनुमंत यांना त्यांच्या पत्नी आणि प्रियकराने "डोळ्याच्या दवाखान्यात दाखवून येऊ" असे सांगून ऑटोमध्ये बसवून नेले. उदगीर शहरातील नांदेड रोडवरील मोरे आय हॉस्पिटलजवळ आल्यावर पत्नी ऑटोमधून उतरली आणि प्रियकर सुनील व त्याच्या मित्रांनी हनुमंत यांना जवळच्या मोकळ्या जागेत नेले. तेथे काठीने बेदम मारहाण करून त्यांचा खून केला. त्यानंतर, ठरल्याप्रमाणे पत्नी घटनास्थळी परत आली आणि तिने पतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.
मुलांमुळे उघडकीस आले सत्य
सुरुवातीला आरोपी महिलेनं आपल्या पतीला कोणीतरी मारल्याचा बनाव केला. मात्र, रात्रभर केलेल्या तपासादरम्यान, पोलिसांना मृत हनुमंत यांच्या सहावीत शिकणाऱ्या मुलाने आणि चौथीत शिकणाऱ्या मुलीने महत्त्वाची माहिती दिली. मुलांच्या माहितीवरूनच या खुनाचे बिंग फुटले. यानंतर पोलिसांनी मृताचा भाऊ विनोद धनराज जनवाडे यांच्या फिर्यादीनुसार उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३ (१), १३७ (२), आणि ३ (५) नुसार पूजा हनुमंत जनवाडे (३५), सुनील उर्फ पिंटू पाटील आणि इतर तीन अनोळखी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी, पोलिसांनी पूजा आणि सुनील यांना अटक केली असून, ऑटोचालकासह अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक देवकर करत आहेत.