माढा : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा उद्या संध्याकाळी थंडावणार आहेत. निवडणूक प्रचाराचा आजचा शेवटचा रविवार असल्यामुळे सगळ्याच राजकीय पक्षांचे नेते प्रचाराचा धडाका लावत आहेत. शरद पवारांनी माढ्याच्या सभेतून आमदार बबन शिंदे आणि रणजितसिंह शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
माढा विधानसभा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारासाठी आमदार बबनराव शिंदे आणि रणजितसिंह शिंदे यांनी शरद पवारांच्या अनेक वेळा भेट घेतल्या त्याचा किस्सा शरद पवारांनी सांगितला. ते अनेकवेळा आले, हात जोडले. नव्यांना संधी द्या म्हणाले. मी म्हणालो नवा कोण? तर म्हणाले माझा लेक. मग मी म्हणालो पुन्हा एकदा ईडची तुमच्यावर कारवाई झाली तर पळून जाणार का? असा टोला शरद पवारांनी हाणला.
advertisement
माझी अपेक्षा होती मी अडचणीमध्ये असताना शिंदे कुटुंब माझ्यापाठीमागे उभं राहील, मात्र एक करमाळ्याला पळाला तर एक माढ्याला पळाला, त्यामुळे या ठिकाणी मी उमेदवारी केली, असं म्हणत शरद पवारांनी अभिजीत पाटील यांचा हात वर करून त्यांना निवडून द्यायचं आवाहन केलं.
गेली 25 वर्षे माढ्यामध्ये पवार समर्थक बबनदादा शिंदे आमदार होते, पण यंदा त्याच बबन शिंदे यांच्या मुलाला पवारांनी शेवटपर्यंत फिर फिर फिरवलं पण तुतारी काय हातात दिली नाही, म्हणून मग बबनदादा शिंदेंनी मुलगा रणजितला अपक्षच मैदानात उतरवलं.
तिकडे करमाळ्यातही संजयमामा शिंदे यांनी गेल्यावेळी सारखाच अपक्ष फॉर्म भरून भावाची परंपरा पुढे नेली, पण आपण आजही अजित पवारांचे कट्टर समर्थक असल्याचे ते जाहिर पणे कबुल करतात.
सोलापुरात पवारांनी मोहिते पाटलांना पुन्हा जवळ केल्याने माढ्याच्या शिंदे बंधूंची काहीशी राजकीय गोची झाली आहे. कदाचित म्हणूनच बबनदादा शिंदे मुलाला घेऊन पवारांकडे वारंवार चकरा मारायचे. पवारांनी अकलूजचा ग्रीन सिग्नल आणायला सांगितला पण ज्यांच्याशी दोन हात केले त्यांचे उंबरे परत कसे झिजवायचे? म्हणून मग सरतेशेवटी या दोन्ही शिंदे बंधूंनी अजित पवार-फडणवीसांच्या सहमतीनेच अपक्षाचा झेंडा हाती घेतल्याचं सांगितलं जातंय, कारण महायुतीच्या चिन्हावर लढलो तर दलित मुस्लीम मतं कदाचित दुरावतील, असा त्यांचा होरा असावा आणि जिंकलो तर पुन्हा नेहमीप्रमाणे दोन्ही कडची दारं आपसूकच उघडतील, असं राजकीय गणित मांडूनच शिंदे बंधूंनी ही अपक्ष चलो रेची रिस्क घेतलीय म्हणे.
