दिगंबर सोनवणे असं आत्महत्या करणाऱ्या पतीचं नाव आहे. या प्रकरणी दिगंबरचे वडील उत्तम सोनवणे यांनी अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी पत्नी अश्वीनीसह तिचा भाऊ संतोष शिंदे आणि आई हिराबाई शिंदे यांच्याविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
नेमकी घटना काय?
दिगंबर सोनवणे हा तरुण आपली पत्नी अश्विनीसोबत कामटवाडे परिसरात राहत होता. त्यांच्या संसारात गेल्या काही काळापासून गृहकलह सुरू होता. दिगंबरचे वडील उत्तम सोनवणे (७१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, अश्विनी ही दिगंबरला नेहमीच हीन वागणूक देत होती. या वादात तिची आई (सासू हिराबाई शिंदे) आणि भाऊ (मेव्हणा संतोष शिंदे) हे देखील सामील होते.
advertisement
भर सोसायटीत मारहाण
१४ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास हा वादाचा प्रकार टोकाला पोहोचला. पत्नीने सासू आणि मेव्हण्याच्या मदतीने दिगंबरला राहत्या सोसायटीतील नागरिकांसमोर बेदम मारहाण केली. या सार्वजनिक अपमानमुळे दिगंबर आधीच मानसिक दडपणाखाली होता.
एवढंच नव्हे तर पत्नी आणि सासू दिगंबरला वारंवार टोमणे मारत असत. "तुझी दोन्ही मुले आयव्हीएफ (कृत्रिम) पद्धतीने झाली आहेत, ती तुझी नाहीत," असे बोलून त्याच्या पुरुषत्वावर शंका उपस्थित केली जात होती. स्वतःच्याच मुलांच्या पितृत्वावरून पत्नीने केलेल्या या दाव्यामुळे दिगंबरचे मनोबल पूर्णपणे खचले. रोजचा जाच, शारीरिक मारहाण आणि पुरुषात्वावर घेतली जाणारी शंका यामुळे दिगंबरने खिडकीच्या अँगलला गळफास लावून आपले जीवन संपवले.
पोलिसांची कारवाई
याप्रकरणी वडील उत्तम सोनवणे यांच्या तक्रारीवरून अंबड पोलीस ठाण्यात पत्नी अश्विनी, सासू हिराबाई शिंदे आणि मेव्हणा संतोष शिंदे यांच्या विरोधात 'आत्महत्येस प्रवृत्त' केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
