भापरभणीत जिल्ह्यात वरपूडकर पॅटर्नची चर्चा रंगलीय. आता तुम्ही म्हणाल हा वरपूडकर पॅटर्न काय आहे? तर त्याचं उत्तर जिल्हा परिषद निवडणुकीच्या उमेदवारीत दडलं आहे. त्यांनी जो राजकीय मेळ साधलाय तो भल्या भल्यांना आजपर्यंत जमला नाही. काहीच महिन्यांपूर्वी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुरेश वरपुडकर यांचा मुलगा समशेर वरपुडकर हे सिंगणापूर जिल्हा परिषद गटातून भाजपचे उमेदवार आहेत. त्यांच्या जोडीला वरपुडकर यांची सून प्रेरणा वरपुडकर या दैठणा गटातून भाजपच्या तिकीटावर मैदानात उतरल्या आहेत. तसंच, लोहगाव गटातून वरपुडकर यांचे पुतणे बोनी वरपुडकर यांनाही भाजपनं संधी दिलीय, अशा प्रकारे वरपुडकर घराण्यातील तीन सदस्यांनी 'कमळ' हाती घेतलंय.
advertisement
कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारीची खिरापत
वरपुडकर यांच्या कन्या सोनल देशमुख यांनी झरी जिल्हा परिषद मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून अर्ज दाखल केलाय. वडील भाजपचे धुरंधर नेते असताना मुलीनं 'ठाकरेंची मशाल हाती घेतल्यानं राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत. कौटुंबिक संघर्षाचा खरा थरार तर लोहगाव गटात पाहायला मिळणार आहे. या गटात सुरेश वरपुडकर यांचे एक पुतणे उत्कर्ष वरपुडकर हे भाजपचे उमेदवार आहेत, तर त्यांच्याच विरोधात दुसरे पुतणे अजित वरपुडकर यांनी काँग्रेसचा पंजा हाती घेतला आहे.
एकच वेळी सर्व पक्षिय उमेदवारी वरपूडकर कुटुंबानं मिळवली आहे. विशेष म्हणजे नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत सुरेश वरपुडकर यांच्या पत्नी भाजपच्या तिकीटावर विजयी झाल्या आहे. कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून केवळ कुटुंबातील व्यक्तींना उमेदवारीची खिरापत वाटली आहे.
छत्रपती संभाजीनगरातही घराणेशाहीचं वर्चस्व
परभणीप्रमाणेच छत्रपती संभाजीनगरातही घराणेशाहीचं वर्चस्व दिसून येत आहे. संभाजीनगरचे आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा अब्दुल आमेर सिल्लोडच्या अंभई गटातून निवडणूक लढवतोय .तर खासदार संदीपान भुमरे यांचा पुतण्या शिवराज भुमरे पैठणच्या पाचोड गटातून नशीब आजमावतोय. ठाकरे सेनेचे माजी आमदार उदयसिंग राजपूत यांनी आपल्या पत्नी कन्नडच्या नागद गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. तर फुलंब्री तालुक्यातील गणोरी जिल्हा परिषदेच्या गटामधून आमदार अनुराधा चव्हाण यांचे पुतणे निखिल कल्याणराव चव्हाण यांना तिकिट मिळालं आहे.
कुठे कोणाला तिकिट?
लातूरच्या रेणापूरमध्ये आमदार रमेश आप्पा कराड यांच्या मुलाला ऋषिकेशला भाजपकडून तिकिट देण्यात आलं आहे.तर काँग्रेसकडून माजी आमदार त्र्यंबक भिसे यांची भावजय सरिता शंकर भिसे या निवडणूक लढवत आहेत. अहमदपूरच्या शिरुर ताजबंद गटातून राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या मुलाला सुरज पाटीलला उमेदवारी देण्यात आली आहे.तर भाजपचे माजी प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांची भावजय रेखा अशोक हाके या खंडाळी गटातून निवडणूक लढवत आहेत.चाकूरच्या रोहिणा जिल्हा परिषद गटातून माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या कन्या सुप्रिया शृंगारे भाजपकडून रिंगणात आहेत.
घराणेशाही लोकशाहीवर भारी
पक्षनिष्ठा आणि स्थानिक विकासाचे मुद्दे बाजूला पडून केवळ घराणेशाही एवढ्या एकाच मुद्द्यावर या निवडणुका गाजत आहेत. तब्बल दशकभरानंतर होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या निवडणुकांमध्ये घराणेशाही लोकशाहीवर भारी पडल्याचं दिसून येतं आहे.
