अमरावती : इच्छा असेल तर मार्ग अनेक या म्हणीला सिद्ध करून दाखवलय अमरावती जिल्ह्यातील वरुड येथील सविता ब्राम्हणे यांनी. सविता गेली कित्येक वर्षापासून शिवणकाम करतात. घरची परिस्थिती बेताची असल्याने इच्छा असूनही मशीन खरेदी करता आली नाही. दुसऱ्याच्या मशीनवर कपडे शिवून सुरू केलेले काम आज त्यांना चांगला नफा मिळवून देत आहे. इतकेच नाही तर वरुड तालुक्यात सविता बुटिकचे चांगले नाव झाले आहे. सविता यांनी सुरू केलेल्या व्यवसायाच्या माध्यमांतून आज 6 महिलांना रोजगार मिळालाय. परिस्थिती बघून खचून जाणाऱ्या महिलांसाठी सविता हे एक जिद्द आणि मेहनतीचे उत्तम उदाहरण आहे.
advertisement
सविता ब्राम्हणे यांच्याशी लोकल18 ने संवाद साधला. तेव्हा त्यांनी त्यांची संघर्षगाथा सांगितली. सविता सांगतात की, या व्यवसायात मला 23 वर्ष झालीत. माझं शिक्षण फक्त 10 वी पर्यंत झालेलं. तेव्हाच मी शिवणक्लास केला. मला त्याची खूप आवड होती. असं वाटतं होतं की कधी कधी क्लास पूर्ण होतात आणि कधी मी कपडे शिवणार. पण, तेव्हा आईकडे परिस्थिती खूप बेताची होती. मी मशीन नव्हती घेऊ शकत.
लग्नात गिफ्ट देण्यासाठी बेस्ट पर्याय, फक्त 30 रुपयांपासून वस्तू, अमरावतीत 'इथं' करा खरेदी
तेव्हा माझ्या शेजारी एक दादा कपडे शिवत होते. मी त्याच्या मशीनवर खूप दिवस काम केले. कपडे घेऊन त्याठिकाणी शिवून देत होते. त्यातून पैसे जमा करून मी एक मशीन घेतली. त्यानंतर गावातच मी कपडे शिवायला सुरुवात केली. गावात 5 वर्ष मी ते काम केलं. तेव्हा गावातील मुली माझ्याकडून कपडे शिवून नेत होत्या ते इतरांना आवडत होते त्यामुळे माझे कस्टमर वाढले.
लग्नानंतर एक वर्ष काम बंद होत. त्यानंतर बाळ झालं आणि आम्ही तेव्हा रेंटने राहत होतो. त्या काकूंनी फोर्स केला आणि मी त्यांचे कपडे शिवून दिले. तेव्हा सुद्धा त्यांचे कपडे इतरांनी बघितले आणि माझ्याकडे ग्राहक यायला लागले. तेव्हा मी त्याच रेंटच्या घरी 2 मशीन घेऊन काम सुरू केले. असं करताना माझे कस्टमर वाढू लागले. मला काम करायला वेळ मिळत नव्हता त्यामुळे मग मी एका गरजू ताईला काम दिलं.
त्यानंतर मोठा हॉल रेंटने घेतला आणि व्यवसाय सुरू केला. त्यानंतर मी कुठलाही क्लास न करता सर्व प्रकारचे कपडे स्वतःच शिवून बघितले आणि ते ग्राहकांना आवडले. त्यामुळं मग ड्रेस डिझायनर म्हणून माझी ओळख वरुड तालुक्यात निर्माण झाली.
यासर्व धावपळीत मी माझ्या मुलाकडे लक्ष नाही देऊ शकली. त्याचं बालपण मला जगता आलं नाही. माझ्या मिस्टरांना वेळ नाही देऊ शकली. पण, त्यांनी कुठलीही तक्रार न करता मला साथ दिली आणि आज त्यांच्यामुळे मी इथे आहे. माझ्याकडे आता खूप सारे नवनवीन कस्टमर येतात. त्यामुळे या व्यवसायातून माझी उलाढाल महिन्याला 1 ते 1.50 लाख पर्यंत आहे, असे सविता सांगतात.