गुजरात ते नाशिक स्वप्नपूर्तीचा प्रवास
अश्विनी राऊळ आणि भूमी यांनी नाशिकमध्ये राधा राणी स्ट्रीट बाईट्स या नावाने आपला खाद्य व्यवसाय सुरू केला आहे. फॅशन डिझायनर असलेल्या अश्विनीने शिक्षिकेची नोकरी केली, पण आयुष्यात काहीतरी मोठे करण्याची ओढ तिला स्वस्थ बसू देत नव्हती. तिने आणि तिची मैत्रीण भूमीने स्वप्नपूर्तीसाठी गुजरात गाठले.
advertisement
गुजरातमध्ये त्यांनी काही काळ नोकरी करत व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल जमवायला सुरुवात केली. स्वतःच्या व्यवसायाचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देत नव्हते. कमी पैशात व्यवसाय सुरू करण्याच्या उद्देशाने त्यांनी सोशल मीडियावर अमेरिकेत स्ट्रीट फूड म्हणून विकला जाणारा ब्रिंग युवर ओन बॅग नावाचा एक अनोखा पदार्थ पाहिला. हा पदार्थ गुजरातमध्ये सुरू केल्यास चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास त्यांना वाटला आणि घरच्यांच्या पाठबळामुळे त्यांनी त्वरित नोकरी सोडून गुजरातमध्ये हा व्यवसाय सुरू केला.
चढ-उतार आणि हार न मानण्याचा निर्धार
गुजरातमध्ये काही महिने व्यवसाय सुरळीत चालला, पण त्यानंतर त्यांना स्थानिक लोकांकडून अनेक अडचणींचा सामना करावा लागला, ज्यामुळे त्यांना तो व्यवसाय काही काळासाठी बंद करावा लागला. या अपयशाने खचून न जाता, त्यांनी पुन्हा गुजरातमध्ये नोकरी केली.
दरम्यान, अश्विनीच्या आवडीचे शहर असलेल्या नाशिकमध्ये व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय दोघींनी घेतला. आपल्याला व्यवसायच करायचा आहे, तर आपण नाशिकमध्येच आपले पाऊल रोवू, असा निर्धार करून या दोघींनी शेवटी नाशिक गाठले आणि आपला व्यवसाय पुन्हा जोमाने सुरू केला.
15 दिवसांत 70,000 रुपयांची कमाई
विविध अडचणींवर मात करत, आज या दोघी तरुणी नाशिकमध्ये कमी वेळेतच प्रसिद्ध झाल्या आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी फक्त 15 दिवसांत तब्बल 70,000 ची कमाई करून दाखवली आहे.
ही तर आमची एक छोटी सुरुवात आहे. आम्हाला आमचे नाव सर्वदूर प्रसिद्ध करायचे आहे, असे या तरुण उद्योजिका आत्मविश्वासाने सांगतात. नोकरीच्या सुरक्षित वातावरणातून बाहेर पडून, आपल्या ध्येयावर विश्वास ठेवून कष्ट केल्यास कोणतीही गोष्ट अशक्य नसते, हेच अश्विनी आणि भूमी यांनी सिद्ध केले आहे.