नोकरी सोडून पूर्णवेळ व्यवसायाचा निर्णय
अविनाश भागवत यांनी तीन वर्षांपूर्वी नोकरी सोडून पूर्णवेळ व्यवसायात उतरण्याचा निर्णय घेतला. केवळ व्यवसाय सुरू करायचा नाही, तर बाजारात काहीतरी वेगळं आणि ठसठशीत ओळख निर्माण करणारा ब्रँड उभारायचा, हा त्यांचा स्पष्ट उद्देश होता. याच विचारातून नेता खादी या नावाने फक्त सफेद रंगाच्या शर्टांचा युनिक ब्रँड सुरू करण्यात आला.
advertisement
Success Story : शेतकऱ्यानं लावलं डोक, करतोय फायद्याची शेती, 3 महिन्यात दीड लाख कमाई
घरातून सुरू झालेला पहिला टप्पा
सुरुवातीला हा व्यवसाय अविनाश भागवत यांनी घरातूनच सुरू केला. दहा बाय दहाच्या खोलीतून उत्पादन, ऑर्डर आणि ग्राहकांशी संपर्क अशी सगळी कामे केली जात होती. सफेद रंगातील उत्तम दर्जाचे शर्ट, अचूक शिवणकाम आणि दर्जेदार कापड यामुळे हळूहळू ग्राहकांमध्ये नेता खादीची ओळख निर्माण होऊ लागली.
अंधेरीतील गाळ्यापासून विस्तार
घरातून सुरू झाल्यानंतर व्यवसायाला वाढती मागणी मिळू लागल्यावर अविनाश भागवत यांनी अंधेरी येथे एक छोटासा गाळा विकत घेतला. तिथून नेता खादीचा व्यवसाय अधिक व्यवस्थित आणि संघटित स्वरूपात सुरू झाला. या टप्प्यावर शर्टांची मागणी वाढू लागली आणि ब्रँडचा विस्तार मुंबईपुरता न राहता इतर शहरापर्यंत पोहोचू लागला.
फक्त सफेद शर्टांची स्वतंत्र ओळख
नेता खादीचे वैशिष्ट्य म्हणजे येथे मिळणारे सर्व शर्ट फक्त सफेद रंगाचे आहेत. विविध रंग आणि डिझाइन असलेले अनेक मोठे ब्रँड बाजारात असताना, फक्त सफेद शर्टांसाठी प्रसिद्ध असलेला ब्रँड म्हणून नेता खादी वेगळा ठरतो. उत्तम दर्जाचे लिनन, दर्जेदार कापड आणि सफेद रंगातील खास चमक ही या ब्रँडची ओळख आहे.
परवडणाऱ्या किमतीत दर्जा
सामान्यपणे बाजारात लिनन किंवा उच्च दर्जाचे सफेद शर्ट 1200 ते 1300 रुपयांपर्यंत मिळतात. मात्र नेता खादीकडे 800 रुपयांपासून शर्ट उपलब्ध असून, दर्जाशी तडजोड न करता सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचणे हा या ब्रँडचा उद्देश आहे.
2025 मध्ये स्टार मॉलमध्ये मराठी ब्रँडची एंट्री
अवघ्या तीन वर्षांत, 2025 च्या अखेरीस, अविनाश भागवत यांनी दादरच्या प्रसिद्ध स्टार मॉलमध्ये स्वतःचे शॉप सुरू केले. अनेक विदेशी कंपन्यांच्या दुकानांमध्ये, मराठी माणसाने उभारलेला मेड इन इंडिया, मेड इन महाराष्ट्र ब्रँड म्हणून नेता खादी आज वेगळा ठसा उमटवत आहे. दहा बाय दहाच्या खोलीतून सुरू झालेला हा प्रवास अंधेरीतील गाळा आणि पुढे थेट स्टार मॉलपर्यंत पोहोचला असून, सफेद शर्टांची वेगळी ओळख निर्माण करणारा नेता खादी ब्रँड मराठी उद्योजकतेचे प्रतीक बनत चालला आहे.