दरम्यान सध्या सोने-चांदीच्या दरात किरकोळ घसरण दिसून आली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या माहितीनुसार, 20 फेब्रुवारी रोजी 24 कॅरेट सोन्याचा दर 132 रुपयांनी घसरून सुमारे 1.54 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला. त्याचप्रमाणे चांदीचा दर 792 रुपयांनी घसरून सुमारे 2.45 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचला. मात्र ही घसरण तात्पुरती असून भविष्यात मोठी तेजी येऊ शकते, असा काही तज्ज्ञांचा अंदाज आहे.
advertisement
चांदीच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होण्यामागे तीन प्रमुख कारणे सांगितली जात आहेत.
1)पुरवठ्यातील तूट. बाजारात चांदीची उपलब्धता मागणीच्या तुलनेत कमी आहे.
2) नव्या तंत्रज्ञानातील वाढता वापर. सोलर पॅनेल्स आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या (EV) निर्मितीत चांदीचा वापर झपाट्याने वाढत आहे.
3)मोठ्या संस्थात्मक गुंतवणूकदारांचा संभाव्य प्रवेश. जर मोठ्या फंडांनी आणि वित्तीय संस्थांनी चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू केली, तर किंमतींना मोठी चालना मिळू शकते.
10 लाख रुपयांपर्यंत दर कसे पोहोचू शकतात, याचाही अंदाज मांडण्यात आला आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत 309 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचली, तर त्याचे रुपयांमध्ये रूपांतर सुमारे 26,265 रुपये प्रति औंस इतके होईल. त्यानुसार एका किलोची किंमत सुमारे 8,44,500 रुपयांपर्यंत जाऊ शकते. यावर 15 टक्के आयात शुल्क (इम्पोर्ट ड्यूटी), 3 टक्के जीएसटी आणि इतर शुल्क जोडल्यास एकूण किंमत सुमारे 10,05,000 रुपये प्रति किलो इतकी होऊ शकते.
मात्र हा अंदाज निश्चित नाही. हा केवळ एक ‘एक्स्ट्रीम’ म्हणजेच सर्वात उच्च संभाव्य अंदाज आहे. तज्ज्ञांनी तीन वेगवेगळ्या परिस्थिती मांडल्या आहेत. बेस केस मध्ये चांदीचा दर सुमारे 4.40 लाख रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतो. मिड केस मध्ये तो 6.50 लाख रुपये प्रति किलोपर्यंत जाऊ शकतो. तर हाय केस मध्ये तो 10 लाख रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
भारतामध्ये चांदीचे दर अनेक घटकांवर अवलंबून असतात. आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत, डॉलर-रुपया विनिमय दर, आयात शुल्क आणि कर, देशांतर्गत मागणी-पुरवठा आणि स्थानिक बाजारातील प्रीमियम या सर्वांचा एकत्रित परिणाम दरावर होतो. याशिवाय, वेगवेगळ्या शहरांमध्ये वाहतूक खर्च, साठवण खर्च, ज्वेलर्सचा मार्जिन आणि स्थानिक मागणी यामुळे दरात थोडाफार फरक दिसू शकतो.
देशात रोज सोने-चांदीचे दर जाहीर करण्यामध्ये इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनसारख्या संस्थांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे येत्या काळात चांदीच्या किंमती खरोखरच विक्रमी पातळीवर जातात का, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.
