या निर्णयाचा लाभ सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्या, ग्रामीण बँका, नाबार्ड तसेच भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) मधील कर्मचारी आणि निवृत्त पेंशनधारकांना मिळणार आहे. हा बदल मागील तारखेपासून लागू केला जाणार असून, मोठा हिस्सा थकबाकी (एरियर) स्वरूपात दिला जाणार आहे.
अर्थ मंत्रालयानुसार सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्या आणि राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) यांच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणा प्रस्तावाला केंद्र सरकारने हिरवा कंदील दिला आहे. त्याचबरोबर RBI आणि नाबार्डमधील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेंशनमध्येही सुधारणा मंजूर करण्यात आली आहे. विमा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी ही वेतन सुधारणा 1 ऑगस्ट 2022 पासून लागू होणार आहे.
advertisement
किती जणांना होणार थेट फायदा?
या निर्णयामुळे एकूण 46,322 कर्मचारी, २३,५७० पेंशनधारक आणि २३,२६० कुटुंबीय पेंशनधारक लाभार्थी ठरणार आहेत. म्हणजेच जवळपास 93 हजार लोकांना या बदलाचा थेट फायदा मिळणार आहे.
सार्वजनिक क्षेत्रातील सामान्य विमा कंपन्यांच्या वेतन सुधारणेसाठी एकूण 8,170.30 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये वेतन थकबाकीपोटी 5,822.68 कोटी रुपये, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) साठी 250.15 कोटी रुपये आणि कुटुंबीय पेंशनसाठी 2,097.47 कोटी रुपयांचा समावेश आहे.
नाबार्ड कर्मचाऱ्यांसाठी काय बदल?
नाबार्डमधील कर्मचाऱ्यांची वेतन सुधारणा 1 नोव्हेंबर 2022 पासून लागू होणार आहे. यामुळे वार्षिक वेतन खर्चात सुमारे 170 कोटी रुपयांची वाढ होईल, तर थकबाकीपोटी एकूण सुमारे 510 कोटी रुपये दिले जाणार आहेत.
पेंशन सुधारणा लागू झाल्यानंतर नाबार्डमधील 269 पेंशनधारक आणि 457 कुटुंबीय पेंशनधारकांना एकरकमी 50.82 कोटी रुपयांची थकबाकी मिळणार आहे. याशिवाय पेंशनच्या मासिक खर्चात सुमारे 3.55 कोटी रुपयांची वाढ होणार आहे.
RBI पेंशनधारकांसाठी दिलासा
केंद्र सरकारने RBI मधील निवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेंशन आणि कुटुंबीय पेंशन सुधारणा प्रस्तावालाही मंजुरी दिली आहे. या निर्णयानुसार, 1 नोव्हेंबर 2022 पासून मूलभूत पेंशन आणि महागाई भत्त्यात 10 टक्क्यांची वाढ केली जाणार आहे.
या पेंशन सुधारणेमुळे एकूण 2,696.82 कोटी रुपयांचा आर्थिक भार सरकारवर येणार आहे. यामध्ये 2,485.02 कोटी रुपये थकबाकी स्वरूपात एकरकमी दिले जाणार असून, वार्षिक खर्चात 211.80 कोटी रुपयांची अतिरिक्त वाढ होणार आहे.
