ब्रोकरेज कंपन्यांनी HDFC बँकेच्या शेअरवर आपला ‘बुलिश’ दृष्टिकोन कायम ठेवला असून शेअरमध्ये सध्याच्या पातळीवरून तब्बल 55 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे. चेअरमन अतनू चक्रवर्ती यांच्या राजीनाम्यानंतर शेअरमध्ये मोठी घसरण झाली असली, तरी Jefferies आणि Motilal Oswal Financial Services यांनी या शेअरमध्ये मोठी वाढीची संधी असल्याचे म्हटले आहे.
गुरुवारी HDFC बँकेचे शेअर्स 5.1 टक्क्यांनी घसरून 800 रुपयांवर बंद झाला होता. दिवसभरात हा शेअर 8.7 टक्क्यांपर्यंत कोसळला होता, जो गेल्या दोन वर्षांतील सर्वात मोठा घसरणीचा दिवस ठरला. आज शुक्रवारी शेअर्स 2.15 टक्क्यांनी घसरुन तो 781 रुपयांवर बंद झाला.
advertisement
चक्रवर्ती यांच्या “मूल्ये आणि नैतिकता” या कारणावरून दिलेल्या राजीनाम्यानंतर गव्हर्नन्सबाबत चिंता निर्माण झाली होती. मात्र जागतिक ब्रोकरेज Jefferies ने HDFC बँकेच्या शेअरवर ‘Buy’ रेटिंग कायम ठेवत 1,240 रुपयांचे टार्गेट दिले आहे, जे सध्याच्या किमतीपेक्षा सुमारे 55 टक्के जास्त आहे. Jefferies च्या मते व्यवस्थापन आणि बोर्डाशी झालेल्या चर्चेत काही “लहान समस्या” असू शकतात, परंतु बँकेच्या कॉर्पोरेट गव्हर्नन्सवर कोणताही परिणाम झालेला नाही.
तसेच केकी मिस्त्री यांची तीन महिन्यांसाठी अंतरिम चेअरमन म्हणून नियुक्ती झाल्याने नेतृत्वात सातत्य राहील आणि गुंतवणूकदारांचा विश्वास वाढण्यास मदत होईल, असेही त्यांनी नमूद केले. चक्रवर्ती यांनी कोणताही गैरप्रकार झालेला नाही असे स्पष्ट केल्याने आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानेही गव्हर्नन्सबाबत कोणतीही गंभीर चिंता नसल्याचे सांगितल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.
देशांतर्गत ब्रोकरेज Motilal Oswal Financial Services नेही ‘Buy’ रेटिंग कायम ठेवत 1,100 रुपयांचे टार्गेट दिले आहे, ज्यात सुमारे 38 टक्के वाढीची शक्यता दर्शवली आहे. या ब्रोकरेजनुसार, बँक आणि नियामक दोघांनीही स्पष्ट केले आहे की राजीनाम्यापूर्वी कोणतेही गव्हर्नन्स, ऑपरेशनल किंवा नियामक प्रश्न उपस्थित नव्हते.
Motilal Oswal ने असेही सांगितले की, केकी मिस्त्री यांची तातडीने अंतरिम चेअरमन म्हणून नियुक्ती आणि बोर्ड व नियामक यांच्यातील समन्वय यामुळे बँकेतील स्थिरता दिसून येते. मिस्त्री यांनी स्वतःही असे नमूद केले की, संस्थेची प्रणाली आणि नैतिक मूल्ये योग्य असल्याशिवाय त्यांनी ही जबाबदारी स्वीकारली नसती, यामुळे गव्हर्नन्सवरील विश्वास अधिक दृढ होतो.
गुंतवणूकदारांचा पूर्ण विश्वास परत मिळवण्यासाठी कायमस्वरूपी चेअरमनची नियुक्ती आणि आगामी CEO उत्तराधिकार प्रक्रियेबाबत स्पष्टता येणे महत्त्वाचे ठरेल, असे Motilal Oswal ने म्हटले आहे.
दरम्यान HDFC बँकेचा शेअर मागील एका वर्षात 9.5 टक्क्यांनी घसरला आहे, तर Nifty 50 निर्देशांकात केवळ 0.8 टक्क्यांची घट झाली आहे. तरीही बँकेची भांडवली क्षमता, तरलता आणि व्यवसायाची गती मजबूत असल्याचे चित्र कायम आहे.
Disclaimer: वरील माहिती हा केवळ शेअरच्या कामगिरीवर आधारित आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही बाजाराच्या जोखमीवर आधारित असते. त्यामुळे गुंतवणूक करण्याआधी सर्टिफाइड इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायजरचा सल्ला घ्यावा. कोणत्याही आर्थिक नुकसानीसाठी News18 जबाबदार असणार नाही.
