'ब्लूमबर्ग'ने दिलेल्या वृत्तानुसार, ट्रम्प प्रशासनाने घेतलेल्या निर्णयाचा मोठा फटका अमेरिकेला बसणार आहे. अमेरिकेचा जीडीपी -0.3 टक्के पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. त्याआधी जीडीपीचा अंदाज 1.3 टक्के इतका वर्तवण्यात आला होता. त्याचा परिणाम नोकरभरतीवर होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील बेरोजगारीचा दर 5.3 टक्के होण्याची शक्यता ब्लूमबर्गने वर्तवली आहे.
अमेरिकेला चीनचे प्रत्युत्तर...
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 एप्रिल रोजी आयातीवर किमान 10 टक्के बेसलाईन टॅरिफ लागू करण्याची घोषणा केली. तर, काही देशांसाठी वेगळ्या दरांची घोषणा केली. चीनने देखील अमेरिकेच्या या निर्णयाला प्रत्युत्तर देत 34 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली.
advertisement
अमेरिकन बाजारावर दिसला परिणाम
चीनच्या घोषणेनंतर एस अँड पी 500 मध्ये 6टक्क्यांनी घसरण झाली. मार्च 2020 नंतर, म्हणजेच कोविड महामारीनंतर, S&P 500 साठी हा सर्वात वाईट आठवडा होता. या काळात, डाऊ जोन्स 5.5 टक्के आणि नॅस्डॅक कंपोझिट 5.8 टक्केने घसरला. डिसेंबरमधील नॅस्डॅक त्याच्या सर्वकालीन उच्चांकापेक्षा 20 टक्क्यांनी खाली आला आहे.
अमेरिकन सेंट्रल बँकेची चिंता वाढली...
अमेरिकन सेंट्रल बँकने अध्यक्ष जेरॉम पॉवेल यांनी या व्यापार युद्धामुळे अधिक नुकसान होण्याचे संकेत दिले आहेत. यामध्ये महागाई, मंद विकास आणि वाढलेली बेरोजगारी यांचा समावेश आहे. त्यांनी स्पष्ट केले की फेड बेंचमार्क दर कमी करण्याचा घाईघाईने निर्णय घेणार नाही.
मंदी येणार?
ब्लूमबर्गच्या मते, जग वेगाने मंदीकडे वाटचाल करत आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय केवळ अमेरिकेसाठीच नाही तर जागतिक अर्थव्यवस्थेसाठीही मोठा धोका आहे. जर 25 टक्के कर लवकरच पूर्णपणे लागू केले गेले आणि अमेरिकेच्या व्यापारी भागीदारांनीही अशाच प्रकारे प्रत्युत्तर दिले तर अमेरिका आणि जागतिक अर्थव्यवस्थेला मोठ्या मंदीचा सामना करावा लागू शकतो, असे मूडीज अॅनालिटिक्सचे मुख्य अर्थतज्ज्ञ मार्क झांडी यांनी म्हटले आहे.