ज्या महिला ई केवायसी करणार नाहीत त्यांना यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. हे मंत्री आदिती तटकरे यांनी थेट ट्विट करुनच स्पष्ट केलं आहे. याबाबत एक परिपत्रक काढण्यात आलं असून सगळ्या लाभार्थी महिलांना हे करणं बंधनकारक आहे. लाडकी बहीण योजनेतील फ्रॉड रोखण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. ज्या महिला अटी-शर्थींमध्ये बसणार नाहीत त्यांची नावं यादीतून वगळण्यात येणार आहेत.
advertisement
मंत्री आदिती तटकरे काय म्हणाल्या?
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना : पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य ! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी https://ladakibahin.maharashtra.gov.in या वेब पोर्टलवर e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी आजपासून पुढील 2 महिन्यांच्या आत सदर e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती.
ही प्रक्रिया अतिशय सहज, सोपी व सुलभ असून, योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी, पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी. ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.
लाडकी बहिण योजनेतील लाभार्थ्यांनी दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्यांच्या कालावधीत e-KYC करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. याबाबत शासनाने अधिकृत परिपत्रक जारी केलं आहे. योजनेत पात्र महिलांची पडताळणी आणि प्रामाणिकरण यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ठराविक कालावधीत e-KYC पूर्ण न केल्यास पुढील कारवाईस लाभार्थी स्वतः जबाबदार असतील, असा स्पष्ट इशारा शासनाने दिला आहे. त्यामुळे लाडकी बहिण योजनेचा लाभ अखंडितपणे मिळावा यासाठी सर्व पात्र महिलांनी तातडीने आपली e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
