पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे आधीच तेल पुरवठा विस्कळीत झाला असताना, आता रशियाकडून तेल खरेदी करण्याच्या मार्गात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताला ३० दिवसांसाठी रशियन तेल खरेदी करण्याची मुभा दिली असली, तरी भारताची सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) रशियन कंपन्यांचे पेमेंट करण्यास नकार दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
advertisement
नेमका पेच काय?
ट्रम्प यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला होता, ज्यामुळे भारताने रशियाकडून तेल खरेदी कमी केली होती. मात्र, जागतिक तणाव पाहता ट्रम्प यांनी भारताला ३० दिवसांची 'विशेष सवलत' दिली आहे. या सवलतीनंतर भारताने पुन्हा स्वस्त रशियन तेल खरेदी करण्याची तयारी केली, मात्र 'OilPrice.com' च्या रिपोर्टनुसार, बँका आता रशियन कंपन्यांना पैसे ट्रान्सफर करण्यास घाबरत आहेत.
SBI का घेत आहे माघार?
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया आपली जागतिक प्रतिष्ठा पणाला लावू इच्छित नाही. यासाठी दोन महत्त्वाची कारणे सांगितली जात आहेत.
अमेरिकेने दिलेली ही सूट फक्त एका महिन्यासाठी आहे. एका महिन्यानंतर ट्रम्प पुन्हा निर्बंध लादतील का? याची शाश्वती नसल्याने बँक धास्तावली आहे.
अमेरिकन बाजारामधील हितसंबंधांचा विचारही बँकेकडून करण्यात आला. SBI च्या आंतरराष्ट्रीय कर्ज पोर्टफोलिओपैकी तब्बल २६ टक्के हिस्सा एकट्या अमेरिकेत आहे. रशियाला पेमेंट केल्यास अमेरिकेच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते आणि बँकेचा अमेरिकेतील व्यवसाय धोक्यात येऊ शकतो, अशी भीती बँकेला वाटत आहे.
भारताच्या इंधन दरांवर परिणाम?
रशियाकडून स्वस्त तेल मिळाले नाही आणि आखाती देशांतील युद्ध थांबले नाही, तर भारतीय बाजारपेठेत इंधनाचे दर कडाडण्याची शक्यता आहे. एसबीआयच्या या भूमिकेनंतर भारत सरकार आता पर्यायी पेमेंट व्यवस्थेचा (उदा. रुपया-रुबल व्यापार) विचार करत असल्याची चर्चा आहे.
