बाजाराचा उलटा डाव
ही गोष्ट सोप्या भाषेत समजून घेऊया. जेव्हा जगात तणाव वाढतो तेव्हा गुंतवणूकदार घाबरतात. अशा वेळी ते शेअर बाजारातून पैसे काढून सोने खरेदी करतात. त्यामुळे युद्धकाळात सोन्याच्या किमती झपाट्याने वाढताना दिसतात. मात्र यावेळी बाजाराची दिशा उलटी आहे.
28 फेब्रुवारीला अमेरिका आणि इराण यांच्यात तणाव वाढायला सुरुवात झाली तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोने सुमारे 5,416 डॉलर प्रति औंसच्या आसपास होते. अनेकांना वाटले की आता सोन्याच्या किमती झपाट्याने वाढतील. पण त्याऐवजी उलट झाले. 9 मार्चपर्यंत सोन्याची किंमत घसरून सुमारे 5,103 डॉलर प्रति औंस इतकी झाली. म्हणजेच सुमारे 5.7 टक्क्यांची घसरण झाली.
advertisement
भारतातही तीच स्थिती
भारतातही जवळपास अशीच परिस्थिती दिसत आहे.
Multi Commodity Exchange (MCX) वर 28 फेब्रुवारीला सोने सुमारे 1.67 लाख रुपये प्रति 10 ग्रॅमच्या आसपास होते. आता ते सुमारे 1.60 लाख रुपयांच्या आसपास आले आहे.
चांदीमध्ये तर घसरण आणखी जास्त झाली आहे.
28 फेब्रुवारीला चांदी सुमारे 2.89 लाख रुपये प्रति किलो होती. आता ती सुमारे 2.63 लाख रुपये प्रति किलोच्या आसपास व्यवहार करत आहे. म्हणजेच चांदीच्या किमती जवळपास 9 टक्क्यांनी घसरल्या आहेत.
मग असे का घडत आहे?
1. डॉलर खूप मजबूत झाला
पश्चिम आशियात तणाव वाढला की तेलाच्या किमती वाढतात. तेलाचा व्यापार प्रामुख्याने डॉलरमध्ये होतो. त्यामुळे जगभरात डॉलरची मागणी वाढते. डॉलर मजबूत झाला की सोन्याच्या किमतींवर दबाव येतो, कारण गुंतवणूकदार डॉलरकडे वळतात.
2. सोने आधीच खूप वाढले होते
गेल्या काही महिन्यांत सोने आणि चांदीच्या किमती आधीच मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. युद्धाच्या बातम्या आल्यानंतर किमती थोड्या वाढल्या आणि अनेक गुंतवणूकदारांनी नफा काढून घेतला. यालाच बाजाराच्या भाषेत प्रॉफिट बुकिंग म्हणतात.
3. सुरक्षित गुंतवणुकीचे पर्याय वाढले
पूर्वी गुंतवणूकदार घाबरले की ते मुख्यतः सोने खरेदी करत. पण आता सुरक्षित गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
उदाहरणार्थ: अमेरिकेचे सरकारी बाँड, डॉलर, तेलाशी संबंधित मालमत्ता, संरक्षण क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स यामुळे गुंतवणुकीचे पैसे फक्त सोन्यात जात नाहीत.
4. शेअर बाजार घसरला तर सोनेही विकले जाते
अलीकडच्या काळात शेअर बाजारातही घसरण झाली आहे. गुंतवणूकदारांना शेअर बाजारात नुकसान झाले की कधी कधी ते सोने विकून रोख रक्कम मिळवतात. कारण गेल्या वर्षभरात सोन्याने चांगला परतावा दिला होता, त्यामुळे अनेकांनी त्यात नफा काढून घेतला.
5. व्याजदर अजूनही जास्त आहेत
आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे उच्च व्याजदर. जेव्हा व्याजदर जास्त असतात तेव्हा लोक बाँड किंवा बँक ठेवीसारख्या गुंतवणुकीकडे वळतात, कारण त्यातून व्याज मिळते. सोने मात्र कोणतेही व्याज देत नाही. त्यामुळे त्याची मागणी काही प्रमाणात कमी होते.
Russia–Ukraine War पेक्षा वेगळे वातावरण
2022 मध्ये Russia आणि Ukraine यांच्यात युद्ध सुरू झाले तेव्हा सोन्याच्या किमती झपाट्याने वाढल्या होत्या. पण यावेळी बाजाराचा दृष्टिकोन वेगळा दिसत आहे. अनेक गुंतवणूकदारांना वाटते की हा संघर्ष मोठ्या जागतिक युद्धात परिवर्तित होणार नाही. त्यामुळे घाबरून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी करण्याची प्रवृत्ती दिसत नाही.
पुढे काय होऊ शकते?
जर हा तणाव दीर्घकाळ टिकला किंवा परिस्थिती आणखी गंभीर झाली, तर सोन्याच्या किमती पुन्हा वाढू शकतात. परंतु सध्या बाजारातील मोठा पैसा डॉलर, बाँड आणि तेलाशी संबंधित मालमत्तांकडे वळताना दिसत आहे. त्यामुळे युद्धासारख्या वातावरणातही सोने आणि चांदीची चमक सध्या थोडी कमी झालेली दिसत आहे.
