१६७ किमीचा मार्ग इतका महत्त्वाचा का?
जगाची ५०% ऊर्जेची गरज याच मार्गावरून पूर्ण होते. आता इराणच्या रिव्होल्यूशनरी गार्ड्सने हा मार्ग बंद करण्याची धमकी दिल्याने भारतात चिंतेचे वातावरण आहे. ओमान आणि इराणच्या दरम्यान असलेला हा अरुंद समुद्रमार्ग जगातील सर्वात महत्त्वाचा 'ऑईल हायवे' मानला जातो. जगातील एकूण तेल वापराचा पाचवा हिस्सा याच १६७ किमीच्या मार्गावरून जहाजांद्वारे प्रवास करतो. इराणने इशारा दिला आहे की, या मार्गावरून जाणाऱ्या कोणत्याही जहाजाला 'आग' लावली जाईल. जर हा मार्ग बंद झाला, तर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती ८० डॉलरवरून थेट २०० डॉलरपर्यंत जाऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
advertisement
तुमच्या खिशावर काय परिणाम होईल?
भारतासाठी ही बातमी धोक्याची घंटा आहे. याचे कारण खालील मुद्द्यांवरून स्पष्ट होते:
पेट्रोल-डिझेलचे दर: कच्च्या तेलाचे भाव वाढले की भारतात इंधनाचे दर गगनाला भिडतील. यामुळे मालवाहतूक महाग होईल आणि पर्यायाने भाजीपाल्यापासून ते जीवनावश्यक वस्तूंपर्यंत सर्वच महाग होईल.
LPG गॅसचा धोका: सर्वात जास्त धोका तुमच्या घरातील गॅस सिलेंडरला आहे. भारत आपल्या वापराच्या एकूण गॅसपैकी दोन-तृतीयांश गॅस आयात करतो. त्यातील ८५ ते ९० टक्के गॅस हा खाडी देशांतून (Hormuz मार्गे) येतो. जर हा पुरवठा थांबला, तर गॅसची टंचाई निर्माण होऊ शकते.
भारताकडे किती दिवस पुरेल इतका साठा?
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, सध्या भारताकडे आपत्कालीन परिस्थितीसाठी काही दिवसांचा बॅकअप आहे. साधारणपणे १७ ते १८ दिवस पुरेल इतका कच्चा तेलाचा साठा भारताकडे आहे. २० ते २१ दिवस पुरेल इतका पेट्रोल आणि डिझेलचा साठा आहे. जर पुरवठा पूर्णपणे बंद झाला, तर सध्याचा साठा जेमतेम दोन आठवडे पुरू शकतो इतकाच LPG चा साठा भारताकडे मर्यादीत उपलब्ध आहे.
सरकारचा 'प्लॅन-बी' : रशिया ठरणार तारणहार?
परिस्थिती गंभीर होत चालल्याने केंद्र सरकारने आता कंबर कसली आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. भारताने काही महत्त्वाचे पाऊल उचलण्याचे ठरवले आहे:
रशियाकडून तेल आयात वाढवणे ही प्राथमिकता आहे. खाडी देशांतून तेल येणे बंद झाले, तर भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करू शकतो. रशियाचे तेलाचे टँकर सध्या समुद्रात तयार आहेत, जे तातडीने भारताकडे वळवले जाऊ शकतात. देशांतर्गत गरज भागवण्यासाठी भारत पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवर बंदी घालण्याचा विचार करत आहे, जेणेकरून भारतीयांना इंधन टंचाई भासणार नाही.
मिडल ईस्टमध्ये सुरू असलेले हे युद्ध केवळ बॉम्ब आणि गोळ्यांपुरते मर्यादित नाही. जर होर्मुझचा हा १६७ किमीचा मार्ग दीर्घकाळ बंद राहिला, तर सर्वसामान्यांच्या बजेटचे पूर्णपणे दिवाळे निघू शकते. अमेरिका आणि इराणचा हा वाद आता थेट भारतीयांच्या ताटावर आणि गाडीच्या टाकीवर परिणाम करणार आहे.
