अलीकडेच उघडकीस आलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे आता तुमची नंबर प्लेट 'असली' की 'नकली' असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नेमका प्रकार काय?
नुकतेच एका कारवाईत बनावट HSRP नंबर प्लेट तयार करणाऱ्या एका कारखान्याचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आश्चर्य म्हणजे, एका साध्या घरात चक्क आधुनिक मशिन्स लावून हुबेहूब ओरिजिनल दिसणाऱ्या नंबर प्लेट्स बनवल्या जात होत्या. 4 लाख रुपयांहून अधिक किमतीचा माल जप्त केल्यावर पोलिसांनाही धक्का बसला की, सर्वसामान्य लोकांची किती मोठ्या प्रमाणावर फसवणूक होऊ शकते.
advertisement
बनावट नंबर प्लेटचा धोका काय?
लोक सहसा वेळ वाचवण्यासाठी किंवा स्वस्त मिळतंय म्हणून अधिकृत एजन्सी सोडून स्थानिक दुकानातून अशा प्लेट्स बनवून घेतात. पण याचे परिणाम गंभीर असू शकतात. बनावट प्लेटचा नंबर सरकारी डेटाबेसमध्ये (Vahan Portal) अपडेट नसतो. त्यामुळे जर तपासणी दरम्यान जर तुमची प्लेट बनावट आढळली, तर तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो आणि मोठी दंडात्मक कारवाई होऊ शकते.
तुमची नंबर प्लेट 'ओरिजिनल' कशी ओळखाल?
अनेकांना वाटतं की प्लेटवर फक्त 'IND' लिहिलं म्हणजे ती हाय-सिक्युरिटी झाली, पण तसं नाही. ओरिजिनल प्लेट ओळखण्याच्या 5 खुणा खालीलप्रमाणे आहेत:
1. क्रोमियम होलोग्राम: प्लेटच्या वरच्या बाजूला डावीकडे निळ्या रंगाचा एक 'होलोग्राम' असतो, जो उन्हात चमकतो.
2. लेझर कोड: प्लेटवर डाव्या बाजूला खालच्या कोपऱ्यात 10 अंकी एक लेझर कोड कोरलेला असतो. तो प्रत्येक प्लेटसाठी वेगळा असतो.
3. रिवेट लॉक: ही प्लेट साध्या स्क्रूने नाही, तर 'प्रेशर रिवेट'ने लॉक केली जाते. एकदा लावली की ती तोडल्याशिवाय काढता येत नाही.
4. निळ्या रंगात 'IND' हे अक्षर विशिष्ट फॉन्टमध्ये लिहिलेले असते.
5. रबर गॅस्केट: ओरिजिनल प्लेटला कडेने काळ्या रंगाची एक रबर बॉर्डर असते.
फसवणूक टाळण्यासाठी काय कराल?
नेहमी आपल्या गाडीच्या अधिकृत शोरूममधूनच नंबर प्लेटची मागणी करा.
सरकारच्या अधिकृत वेबसाईटवरून (उदा. BookMyHSRP किंवा तत्सम अधिकृत पोर्टल्स) ऑनलाइन नोंदणी करा.
रस्त्यावरच्या कोणत्याही साध्या दुकानातून 'HSRP' सारखी दिसणारी प्लेट बनवून घेऊ नका.
तुमच्या गाडीची नंबर प्लेट ही तिची ओळख आहे. केवळ काही रुपये वाचवण्यासाठी किंवा घाई करण्यासाठी बनावट रॅकेटच्या जाळ्यात अडकू नका. जर तुम्हाला तुमच्या प्लेटबद्दल शंका असेल, तर आजच जवळच्या आरटीओ (RTO) कार्यालयात जाऊन तिची पडताळणी करा.
