नवी दिल्ली: भारत आणि अमेरिका यांच्यातील ट्रेड डीलबाबत गेल्या अनेक काळापासून चर्चा सुरू आहे. आता केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की दोन्ही देश फ्रेमवर्क ट्रेड डीलच्या खूप जवळ पोहोचले आहेत. मात्र या करारासाठी कोणतीही ठराविक तारीख सांगता येणार नाही, असे वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी स्पष्ट केले आहे. यामागचे कारण सांगताना त्यांनी नमूद केले की ट्रेड डील ही कोणतीही मजबुरी नसून, दोन्ही देशांच्या फायद्यासाठी होणारा करार असतो.
advertisement
सरकारने नेमके काय सांगितले, हे सोप्या शब्दांत समजून घेऊया. वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सांगितले की, भारत आणि अमेरिका टॅरिफच्या मुद्द्यावर एका फ्रेमवर्क डीलच्या जवळ आहेत. मात्र यावर कोणतीही डेडलाईन देणे योग्य नाही, कारण FTA (Free Trade Agreement) किंवा BTA (Bilateral Trade Agreement) हे नेहमी ‘विन-विन’ स्वरूपाचे असतात, दबावाखाली केलेले नसतात.
सरकारने हेही मान्य केले की चर्चेला गती मिळावी यासाठी आंतरिक वेळापत्रक (internal timelines) निश्चित केली जातात. मात्र सार्वजनिकरित्या कोणतीही तारीख जाहीर करणे कठीण असते, असे सरकारने स्पष्ट केले.
आतापर्यंत भारत-अमेरिका ट्रेड चर्चेत किती प्रगती झाली आहे, या प्रश्नावर सरकारने सांगितले की दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 6 फेऱ्यांमध्ये चर्चा झाली आहे. या चर्चा पूर्ण स्वरूपाच्या द्विपक्षीय व्यापार करारावर (Full-fledged Bilateral Trade Agreement – BTA) केंद्रित होत्या. अलीकडेच अमेरिकेचे Deputy US Trade Representative भारत दौऱ्यावर आले होते.
सरकारने स्पष्ट केले की हा दौरा नवीन चर्चा सुरू करण्यासाठी नव्हता. तर आतापर्यंत चर्चा कोणत्या टप्प्यावर आहे, कोणत्या मुद्द्यांवर सहमती झाली आहे आणि कोणते मुद्दे प्रलंबित आहेत, याचा आढावा घेण्यासाठी होता. सरकार या बैठकींना ‘स्टॉक-टेकिंग मीटिंग्स’ असे संबोधत आहे.
दरम्यान अंतरिम करार (Interim Deal) संदर्भातही चर्चा सुरू असल्याचे सरकारने मान्य केले आहे. वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की चर्चेदरम्यान एक interim deal हा पर्यायही विचारात घेतला गेला आहे. या अंतरिम कराराचा मुख्य उद्देश म्हणजे reciprocal tariffs, म्हणजेच एकमेकांवर लावल्या जाणाऱ्या समान टॅक्सच्या मुद्द्यावर तोडगा काढणे. सोप्या शब्दांत सांगायचे झाले, तर पूर्ण ट्रेड डीलला वेळ लागल्यास काही टॅरिफ संबंधित मुद्दे आधीच सोडवले जाऊ शकतात.
पुढील टप्प्यात चर्चा कशी होणार, याबाबत सरकारने सांगितले की FTA किंवा BTA मध्ये जेव्हा केवळ काही मुद्दे शिल्लक राहतात, तेव्हा औपचारिक चर्चेच्या फेऱ्या थांबवल्या जातात. असेच काहीसे भारत–न्यूझीलंड ट्रेड चर्चेत घडले होते. आता भारत-अमेरिका ट्रेड डीलवरील अंतिम निर्णय वाणिज्य सचिवांच्या स्तरावर घेतले जातील, तसेच दोन्ही देशांच्या मंत्रिस्तरीय पातळीवरही निर्णय होतील.
दरम्यान सरकारने 15 डिसेंबर रोजी ट्रेड डेटा जाहीर करताना एक महत्त्वाची माहिती समोर आणली. सरकारनुसार अमेरिकेने भारतावर 50% टॅरिफ लावूनही एप्रिल ते नोव्हेंबर 2025 या कालावधीत भारताचा अमेरिकेला होणारा निर्यात व्यापार 11.38% ने वाढला आहे. विशेष म्हणजे नोव्हेंबर 2025 मध्ये अमेरिकेला होणारी निर्यात, नोव्हेंबर 2024 च्या तुलनेत 1.3 अब्ज डॉलर्सने जास्त होती. सरकारने यावर स्पष्ट केले की हा आकडा दर्शवतो की, अमेरिकेत भारतीय वस्तूंना अजूनही मजबूत मागणी आहे.
अलीकडे चर्चेत असलेला आणखी एक मुद्दा म्हणजे तांदळाचा (Rice) विषय. काही काळापासून अशी भीती व्यक्त केली जात होती की अमेरिका भारतीय तांदळावर anti-dumping चौकशी सुरू करू शकते. यावर वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले की भारतीय तांदळाच्या निर्यातीवर कोणतीही anti-dumping चौकशी सुरू नाही.
अमेरिकेला जाणाऱ्या भारतीय तांदळापैकी सुमारे 80% हिस्सा GI-टॅग असलेल्या बासमती तांदळाचा आहे. ज्याची किंमत इतर देशांच्या तांदळाच्या तुलनेत जास्त असते. त्यामुळेच अमेरिकेने भारतीय तांदळावर कोणतीही anti-dumping कारवाई सुरू केलेली नाही, असे सरकारने सांगितले.
आता या सर्व चर्चेचा सामान्य नागरिक आणि गुंतवणूकदारांसाठी अर्थ काय आहे, या प्रश्नावर तज्ज्ञांनी CNBC आवाजला सांगितले की भारत-अमेरिका ट्रेड डील मोठ्या प्रमाणावर पुढे सरकली आहे. मात्र सरकार घाई करू इच्छित नाही. निर्यात अजूनही मजबूत स्थितीत आहे आणि टॅरिफविषयक प्रश्नांवर तोडगा निघण्याची दिशा स्पष्टपणे दिसत आहे.
एकूणच या सर्व घडामोडींवरून हे स्पष्ट झाले आहे की भारत-अमेरिका ट्रेड डीलची घोषणा फार दूर नाही. मात्र यासाठी अद्याप कोणतीही निश्चित तारीख ठरलेली नाही. चर्चा आता तांत्रिक पातळीवरून पुढे जाऊन निर्णयांच्या टप्प्यावर पोहोचली आहे. सरकारचा भर दबावाखाली करार करण्यावर नाही, तर संतुलित आणि दोन्ही देशांना फायदेशीर ठरणाऱ्या डीलवर आहे.
म्हणजेच डील नेमकी कधी होईल हे नंतर कळेल, पण डील होणार की नाही याबाबतची चित्र आता बर्यापैकी स्पष्ट झाली आहे.
