IOCL ने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलं की, “देशभरात आमच्याकडे इंधनाचा भरपूर साठा आहे आणि आमची सप्लाय लाइन पूर्णपणे सुरळीत आहे. नागरिकांनी घाबरण्याचं काहीही कारण नाही. घाबरून खरेदी करू नका.” 'ऑपरेशन सिंदूर'नंतर देशात निर्माण झालेल्या अस्वस्थतेच्या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये पुरवठा संपेल यांची भीती निर्माण झाली आहे.
भारताने पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमधील (PoK) नऊ ठिकाणी दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर क्षेपणास्त्र हल्ले केल्यानंतर सीमारेषेवर गोळीबार वाढला आहे. यामुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून अनेक भागांमध्ये इंधन साठवण्यासाठी गर्दी होत आहे. IOCLने स्पष्ट केलं की सर्व आउटलेट्सवर पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी उपलब्ध आहे. “कृपया शांत राहा आणि गरजेपेक्षा जास्त खरेदी टाळा. अनावश्यक गर्दी केल्याने वितरण व्यवस्था बिघडू शकते आणि इतरांना अडचण निर्माण होऊ शकते,” असं आवाहन कंपनीने केलं आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या माहितीनुसार, पंजाबमधील एका पेट्रोल पंप विक्रेत्याने सांगितलं की गेल्या दोन दिवसांत त्यांच्या विक्रीत तीनपट वाढ झाली आहे. “लोक भयभीत आहेत आणि इंधनासोबतच राशन साठवण्याकडेही वळले आहेत,” असं त्यांनी म्हटलं.