मध्यपूर्वेतील युद्धाचा भडका आता जागतिक अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचला असून कच्च्या तेलाच्या किमतींनी गेल्या साडेतीन वर्षांतील उच्चांक गाठला आहे. पण, या महासंकटातही भारतीय सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे.
सोमवारी जागतिक बाजारपेठ उघडताच कच्च्या तेलाच्या किमतीत १७ टक्क्यांची प्रचंड मोठी उसळी पाहायला मिळाली. कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल १०७ डॉलरच्या पार गेले असून गेल्या साडेतीन वर्षांतील हा सर्वात मोठा आकडा आहे. इराणने स्ट्रेट ऑफ होर्मुज हा महत्त्वाचा सागरी मार्ग बंद करण्याची धमकी दिल्याने आणि अमेरिका-इस्रायलने इराणच्या तेल डेपोंवर हल्ले केल्यामुळे जागतिक पुरवठा साखळी पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.
advertisement
इराक आणि कुवैतसारख्या देशांनीही आपला उपसा कमी केल्यामुळे कच्च्या तेलाचा तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे अमेरिका आणि युरोपमध्ये पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढण्यास सुरुवात झाली आहे. खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही दरवाढ तात्पुरती असल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात अमेरिकेत पेट्रोलच्या किमती ४७ सेंट्सनी वाढल्या आहेत.
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाने शंभरी ओलांडली असली, तरी भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ केली जाणार नसल्याचे सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले आहे. भारत सध्या आपल्या ऊर्जा स्त्रोतांमध्ये मोठी विविधता आणत असून, देशाकडे तेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे.
नुकत्याच झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देशाचा इंधन साठा सुरक्षित असल्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे शेजारील देश आणि युरोपमध्ये तेलाचे भाव गगनाला भिडलेले असताना, भारतातील ग्राहकांच्या खिशाला मात्र या जागतिक संकटाचा फटका बसणार नाही.
