जीत वाघेला आणि कार्तिक हे दोघेही गेली चार वर्षांपासून आयटी क्षेत्रात काम करत आहेत. दोघांनाही जवळपास साडेपाच लाखांपर्यंत वार्षिक पॅकेज आहे. मात्र, पुढील काळात नोकरीची खात्री नसणे, प्रोजेक्ट संपल्यानंतर नोकरीवर परिणाम होण्याची शक्यता यामुळे त्यांनी फक्त नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा पर्याय तयार करण्याचा निर्णय घेतला. याच विचारातून त्यांनी दोघांनी मिळून स्वतःच्या सेव्हिंग्समधून गुंतवणूक करत कांदिवलीमध्ये क्रेओ क्लॉक्स या नावाने पार्टटाइम कॅफे सुरू केला. दोघेही सध्या नोकरी करत असतानाच हा व्यवसाय सांभाळत आहेत.
advertisement
हा कॅफे संध्याकाळच्या वेळेत, साधारण चार ते पाच तास चालवला जातो. येथे विविध प्रकारचे खाद्यपदार्थ अगदी 60 रुपयांपासून उपलब्ध असल्याने परिसरातील तरुणांमध्ये हा कॅफे लोकप्रिय ठरत आहे.
या व्यवसायातून सध्या दरमहा सुमारे 60 ते 70 हजार रुपयांची कमाई होत आहे. विशेष म्हणजे, फक्त चार-पाच तासांच्या कामातून मिळणारी ही कमाई पाहता, भविष्यात हा व्यवसाय पूर्णवेळ केल्यास अधिक चांगला नफा मिळू शकतो, असा विश्वास या दोघा मित्रांनी व्यक्त केला आहे.
नोकरीसोबतच स्वतःचा व्यवसाय उभारण्याचा पर्याय निवडत या दोघांनी पुढील काळासाठी मजबूत पायाभरणी केली आहे. कांदिवलीतील जीत वाघेला आणि कार्तिक यांचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी मार्गदर्शक ठरत आहे.