या सगळया नाट्याची सुरुवात १८ डिसेंबरला झाली. 'जय अंबे प्लायवूड' आणि 'जय दुर्गा हार्डवेअर'वर धाड पडली तेव्हा तिथे टॅक्स चोरीचे ढीगभर पुरावे सापडले. पण अधिकान्यांनी कायद्याचा बडगा उगारण्याऐवजी तिथेच हप्त्याची गणितं मांडायला सुरुवात केली. छापेमारी सुरू असतानाच नरेश गुप्ता नावाच्या वकिलानं एन्ट्री घेतली. "मी मॅडमशी बोलतो, सगळं मिटवून टाकतो," असं म्हणत त्यानं व्यापाऱ्यांच्या भीतीचा फायदा घ्यायला सुरुवात केली.
advertisement
पण खेळ तिथं संपला नव्हता. सुपरिटेंडंट अनिल तिवारीनं व्यापाऱ्यांना असा काही धाक घातला की त्यांची बोलतीच बंद झाली. "अहो, प्रत्यक्ष मॅडम (प्रभा भंडारी) फिल्डवर आहेत, त्या खूप कडक आहेत आणि काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत," असा निरोप व्यापाऱ्यांपर्यंत पोहोचवला गेला. व्यापाऱ्यांच्या मनात कायद्याची एवढी भीती भरवली गेली की, ते स्वतःहून दीड कोटी द्यायला तयार व्हावेत, अशी ही थंड डोक्यानं रचलेली चाल होती.
त्यानंतर सुरू झाला तो भेटीगाठींचा आणि लाचारीचा प्रवास. १९ डिसेंबरला व्यापाऱ्यांनी चक्क अनिल तिवारीचं घर गाठलं. तिथे दीड कोटींचा आकडा समोर ठेवला गेला. २३ डिसेंबरला पहिला ३० लाखांचा हप्ता दिला गेला. पण तरीही मॅडमचं समाधान झालं नव्हतं. उरलेले ७० लाख उभे करण्यासाठी व्यापाऱ्यांनी अक्षरशः नातेवाईक आणि मित्रांकडे हात पसरले. सीबीआय म्हणतंय की, व्यापाऱ्यांनी खूप विनवण्या केल्या, "मॅडम, थोडं कमी करा," असं म्हणून पाहिलं, पण प्रभा भंडारी आपल्या दीड कोटींच्या आकड्यावरून तसूभरही मागे हटायला तयार नव्हत्या.
शेवटी, ज्या पैशांच्या माजात या मॅडम व्यापाऱ्यांना रडवत होत्या, तोच पैसा त्यांच्या विनाशाला कारणीभूत ठरला. ३० लाख आधीच खिशात घातले होते आणि उरलेले ७० लाख घेण्यासाठी जो हव्यास दाखवला, त्यानं त्यांना गजाआड पोहोचवलं. "एक रुपयाही कमी नको" म्हणणाऱ्या मॅडमचा हा माज शेवटी सीबीआयनं उतरवला आणि त्यांना अटक केली आहे. या प्रकरणी सीबीआयने मोठी कारवाई केली असून संपत्ती जप्त केली आहे.
