मुंबई : जेपी मॉर्गन चेसचे सीईओ जेमी डिमन यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) संदर्भात मोठा इशारा दिला आहे. त्यांच्या मते, AI मुळे भविष्यात मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या संपुष्टात येणार आहेत. दीर्घकालीन दृष्टीने AI जरी तंत्रज्ञान उत्पादकता आणि जीवनमान सुधारण्याचे आश्वासन देत असली तरी हा धोका असल्याचे त्यांनी सांगितले.
advertisement
फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत, बाजार भांडवलाच्या दृष्टीने जगातील सर्वात मोठ्या बँकेचे प्रमुख असलेल्या डिमन यांनी सांगितले की, समाजाने कार्यबलात होणाऱ्या या बदलांसाठी स्वतःला तयार केले पाहिजे. विशेषतः अशा कौशल्यांवर भर दिला पाहिजे, जी कौशल्ये यंत्रे किंवा मशीन सहजपणे नक्कल करू शकत नाहीत. डिमन यांनी AI च्या क्षमतेबाबत सकारात्मक भूमिका घेतली असली, तरी येणाऱ्या बदलांविषयी त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला. “AI नोकऱ्या संपवेल,” असे त्यांनी ठामपणे सांगितले. तसेच समाजाने लवकर जुळवून घेतले नाही, तर बदलांची गती आव्हानात्मक ठरू शकते, असेही त्यांनी नमूद केले.
जेमी डिमन यांनी AI च्या उदयाची तुलना ट्रॅक्टर, खत आणि लसीसारख्या भूतकाळातील मोठ्या तांत्रिक शोधांशी केली. या शोधांनी सुरुवातीला अडथळे निर्माण केले. पण अखेरीस अर्थव्यवस्था बदलून टाकली आणि लोकांचे जीवनमान उंचावले. मात्र त्यांनी हेही मान्य केले की निकट भविष्यात नोकऱ्यांचे नुकसान टाळता येणार नाही.
AI मुळे मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जाण्याची शक्यता असल्याचे डिमन यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केले. “बहुतेक प्रकरणांमध्ये AI मानवतेसाठी अतिशय चांगल्या गोष्टी करेल,” असे ते म्हणाले. “कदाचित एक दिवस आपण कमी मेहनत करू, पण आपले आयुष्य अधिक चांगले असेल,” असेही त्यांनी नमूद केले.
मात्र हे भविष्य कोणत्याही मोठ्या उलथापालथीशिवाय येणार नाही, हेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की AI मुळे पुढील एका वर्षात लगेच मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जाणार नाहीत, अशी त्यांना अपेक्षा नाही. तसेच कंपन्या सध्या भरती करताना जे सावधपण दाखवत आहेत. त्यामागे AI कारणीभूत असल्याचा दावा त्यांनी फेटाळून लावला. त्यांच्या मते सध्याच्या परिस्थितीसाठी व्यापक आर्थिक घटक जबाबदार आहेत.
ऑटोमेशन जसजसे वाढत आहे, तसतसे कामगारांनी केवळ तांत्रिक ज्ञानापुरते मर्यादित न राहता इतर क्षमतांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन डिमन यांनी केले. AI-चालित अर्थव्यवस्थेत समीक्षात्मक विचारसरणी, भावनिक बुद्धिमत्ता, सर्जनशीलता आणि स्पष्ट संवाद कौशल्ये अधिकाधिक महत्त्वाची ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
डिमन यांनी इशारा देत म्हटले की, “लोकांनी वाळूत डोके खुपसून बसणे थांबवले पाहिजे.” त्यांच्या मते नोकऱ्या विस्थापित होणार याचा अर्थ असा नाही की लोकांना कामच मिळणार नाही. मात्र हे तेव्हाच शक्य होईल जेव्हा लोक बदल स्वीकारण्यास आणि स्वतःला नव्याने घडवण्यास तयार असतील. त्यांनी सावधगिरीचा इशारा देत सांगितले की, जर बदल फार वेगाने झाले; तर समाजाला मोठ्या प्रमाणावर विस्थापित झालेल्या कामगारांचे पुनःप्रशिक्षण आणि पुनर्वसन करणे कठीण जाऊ शकते.
AI च्या परिणामांबाबत जेमी डिमन यांनी यापूर्वीही चिंता व्यक्त केली आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांनी भाकीत केले होते की आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे विकसित अर्थव्यवस्थांमध्ये पुढील 20 ते 40 वर्षांत लोकांना खूप कमी तास काम करावे लागेल. कदाचित आठवड्यात फक्त साडेतीन दिवस काम करणे पुरेसे ठरेल, असे त्यांनी म्हटले होते.
मियामी येथे झालेल्या अमेरिकन बिझनेस फोरममध्ये बोलताना त्यांनी सांगितले होते, “माझा अंदाज आहे की विकसित जग 20, 30 किंवा 40 वर्षांत आठवड्यात साडेतीन दिवस काम करेल.” त्यांनी अशा भविष्याची कल्पना मांडली होती, जिथे AI एजंट्स दिवसाच्या सुरुवातीपासूनच संशोधन आणि दैनंदिन कामांमध्ये लोकांना मदत करतील.
मात्र डिमन यांनी यावर भर दिला की सरकारे, कंपन्या आणि संपूर्ण समाजाने हा बदल अतिशय काळजीपूर्वक हाताळला पाहिजे. प्रशिक्षण, नोकरीतील बदल, उत्पन्न सहाय्य आणि लवकर सेवानिवृत्ती यासंबंधी अधिक चांगले नियोजन करण्याचे त्यांनी आवाहन केले. त्यांच्या मते औद्योगिक बदलांच्या मागील लाटांमध्ये या धड्यांची पूर्ण अंमलबजावणी झाली नव्हती आणि यावेळी ती चूक पुन्हा होऊ नये.
