या योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसी करणं आता बंधनकारक करण्यात आलं आहे. या प्रक्रियेसाठी पुढील दोन महिन्यांची मुदत देण्यात आली असून, त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही, अशी माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करुन दिली आहे.
लाडकी बहीण योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अनियमितता आणि गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आलं. अडीच लाखांहून अधिक उत्पन्न असलेल्या महिलांनी, तसेच काही सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आलं होतं. याशिवाय, धक्कादायक बाब म्हणजे काही पुरुषांनीही चुकीची माहिती देऊन योजनेचा लाभ घेतल्याचे उघड झालं होतं. अशा प्रकारच्या गैरव्यवहारांना आळा घालण्यासाठी आणि गरजू महिलांनाच या योजनेचा लाभ मिळावा, या उद्देशाने सरकारने हा निर्णय घेतला आहे.
advertisement
या योजनेची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गैरप्रकार टाळण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केलं आहे. ज्या महिला निर्धारित वेळेत ई-केवायसी पूर्ण करणार नाहीत, त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत. या संदर्भात, सरकारने ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाइटवर लॉगिन करून ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन केलं.
सगळी कामं सोडा, आधी 'हे' करा! अन्यथा लाडकी बहिणीचा हप्ता होईल बंद
ई-केवायसीची प्रक्रिया:
सर्व प्रथम ladkibahin.maharashtra.gov.in या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
पोर्टलवर लॉगिन करून तुमचे आधार कार्ड आणि इतर माहिती भरा.
तुमच्या आधार कार्डशी संलग्न असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी (OTP) येईल.
तो ओटीपी टाकून तुमची ओळख सत्यापित करा.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या प्रक्रियेमुळे केवळ पात्र आणि गरजू महिलाच योजनेच्या लाभासाठी पात्र राहतील. त्यामुळे ज्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे, त्यांनी तातडीने पुढील दोन महिन्यांत ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. अन्यथा, त्यांना मिळणारा सन्मान निधी बंद होण्याची शक्यता आहे. ही मुदत केवळ दोन महिन्यांची असून, यानंतर कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ दिली जाणार नाही, यावर सरकारने भर दिला आहे.