ठाणे : नोकरी करण्यापेक्षा हल्ली अनेकांना व्यवसाय करावासा वाटतो. मराठी मंडळीही यात मागे नाहीत. ठाण्यातील मराठी महिला ललिता पाटील यांनी सुद्धा एका छोट्या व्यवसायाचे आता मोठ्या व्यवसायात रूपांतर केले आहे. 2016 मध्ये ललिता यांनी केवळ 2,000 रुपयांमध्ये टिफिन सेवा सुरू केली होती. आवड आणि गरज म्हणून हा व्यवसाय करत असतानाच त्यांनी 2019 मध्ये ब्रिटानिया इंडस्ट्रीजची स्टार्टअप स्पर्धा जिंकून 7 लाख रुपये जिंकले. या पैशातून त्यांनी टिफिन सेवेचा व्यवसाय वाढवून स्वत:चं 'घरची आठवण' हे रेस्टॉरंट सुरू केलं. आता त्यांचा हाच बिझनेस महिन्याला त्यांना 6 ते 7 लाख रुपये त्यांना मिळवून देतो.
advertisement
या 'घरची आठवण' रेस्टॉरंट मध्ये तुम्हाला अगदी व्हेज, नॉन व्हेज आणि मच्छी या सगळयामध्ये तुम्हाला अनेक पदार्थ मिळतील. व्हेज म्हणजे तुम्हाला व्हेज थाळी इथे फक्त 120 रुपयांना मिळेल. यात तुम्हाला डाळ, भात, दोन भाज्या, पापड, पोळी, एखादा गोड पदार्थ हे सगळं मिळतं. भाजीमध्ये सुध्दा रोज वेगवेगळया भाज्या इथे मिळतात.
Original लेदरच्या वस्तू हव्यात? मुंबईत इथं करा स्वस्तात खरेदी, 100 पेक्षा जास्त व्हरायटी
ज्यात छोले मसाला, व्हेज कोल्हापुरी, मटार पानी, शेव भाजी, मटकी उसळ आहेत. इथे मिळणारा मटार पुलाव, डाळफ्राय तडका सुद्धा खूप चविष्ट लागतो. नॉनव्हेजमध्ये कोलंबी बिर्याणी 220, चिकन मसाला 100, चिकन सुखा थाळी, अंडा करी हे मिळेल. मच्छीमध्ये सुध्दा इथे सुरमई फ्राय, कोळंबी मसाला, बांगडा फ्राय, बोंबील फ्राय हे आणि अनेक वेगवेगळे, चविष्ट पदार्थ उपलब्ध आहेत.
ललिता यांचं वयाच्या 20 व्या वर्षी लग्न झालं. त्या फिजिक्स ग्रॅज्युएट असून आर्थिक बाबतीत स्वतंत्र असावं अशी त्यांनी नेहमीपासूनची इच्छा होती. यावेळी सुरुवातीला त्यांनी मुलांचे ट्यूशन घेतले. त्यानंतर फार्मसी कंपनीची औषधं देखील विकली. एक स्पर्धा जिंकून खूप चांगला फायदा आज ललिता यांना होत आहे. महिलांसाठी ललिता पाटील या खरच आदर्श आहेत.
'बाहेर गावाहून आलेल्या व्यक्तींना त्यांच्या घरातील जेवणाची चव सतत आठवते. म्हणूनच मी हॉटेलचे नाव घरची आठवण ठेवलं. प्रत्येक गृहिणीमध्ये व्यवसाय करण्याची ताकद असते फक्त तिला तसं मार्गदर्शन मिळायला पाहिजे आणि तिच्याकडे व्यवस्थित बिझनेसचा प्लॅन हवा. व्यवस्थित अभ्यास करून जर व्यवसाय सुरू केला तर तो आपल्याला प्रॉफिट करून देतो आणि चांगल्या पद्धतीने चालतो' असे व्यावसायिका ललिता पाटील यांनी सांगितले.
तुम्हाला सुद्धा घरगुती प्रकारचे चविष्ट अन्न खायचं असेल तर आवर्जून ठाण्यातील नौपाडा, शिवाजीनगर येथे असणाऱ्या घरची आठवण याला भेट द्या.