मुंबई : स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने आपल्या प्रायोरिटी बँकिंग युनिटमधील कथित फसवणुकीच्या चौकशीचा आवाका वाढवला आहे. नोव्हेंबर महिन्यात बेंगळुरू येथील एका शाखेत ग्राहकाच्या खात्यातून पैसे गायब झाल्याची तक्रार समोर आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, आता बँकेने या प्रकरणातील चौकशी अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला आहे.
advertisement
या चौकशीत बेंगळुरूच्या एम.जी. रोड शाखेत खाती असलेल्या काही श्रीमंत ग्राहकांच्या किमान 80 कोटी रुपयांच्या निधीमध्ये गोंधळ झाल्याचे संकेत मिळत आहेत.
हे प्रकरण गेल्या महिन्यात एका ग्राहकाच्या तक्रारीनंतर उघडकीस आले. संबंधित ग्राहकाने आपल्या खात्यातून 2.7 कोटी रुपयांची हेराफेरी झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची गांभीर्य लक्षात घेता, कर्नाटक सरकारने बेंगळुरू सिटी पोलिसांना हा तपास राज्याच्या क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट (CID) कडे वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.
हा तपास CID कडे सोपवण्याचे कारण स्पष्ट करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, या कथित हेराफेरीची रक्कम 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याने प्रकरण गंभीर स्वरूपाचे आहे. स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याची अधिकृतपणे पुष्टी केली आहे.
चौकशी कोण करणार?
ईटी (Economic Times) च्या प्रश्नांना उत्तर देताना स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने सांगितले, आमच्या ग्राहकांचे हित हे आमच्यासाठी सर्वोच्च प्राधान्य आहे. या प्रकरणात बेंगळुरू शाखेतील एका कर्मचाऱ्याने काही अनियमितता केल्याचे आढळून आले आहे. बँक कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाबाबत झिरो-टॉलरन्स धोरण ठेवते. त्यामुळे तात्काळ पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. संबंधित व्यक्तीला पोलिसांनी अटक केली असून बँकेने त्याला सेवेतून बडतर्फ केले आहे.
बँकेने प्रभावित झालेल्या ग्राहकांशी स्वतः संपर्क साधला असून आंतरिक चौकशी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुमारे दोन आठवड्यांपूर्वी झालेल्या प्राथमिक आंतरिक तपासात अनेक गंभीर त्रुटी समोर आल्यानंतर, PwC (प्राइसवॉटरहाऊसकूपर्स) या संस्थेला चौकशीची जबाबदारी देण्यात आली आहे.
गेल्या महिन्यात एका ग्राहकाने तक्रार केली होती की, त्याच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये (FD) ठेवलेले 2.7 कोटी रुपये गायब झाले आहेत.
बँकेची बाजू
सूत्रांच्या माहितीनुसार, तपासात असे आढळून आले आहे की ग्राहकांच्या निधीचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर करण्यात आला. एका सूत्राने सांगितले, काही अतिशय उच्च-प्रोफाइल ग्राहक या प्रकरणामुळे संतप्त आहेत. हे ग्राहक श्रीमंत व्यावसायिक कुटुंबांशी संबंधित आहेत.
स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने प्रभावित ग्राहकांचे कोणतेही आर्थिक नुकसान झाल्यास पूर्ण भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. स्टॅनचार्टने ईटीला सांगितले की, सध्या पोलीस तपास आणि बँकेची आंतरिक चौकशी दोन्ही सुरू आहेत. बँक संबंधित यंत्रणांना पूर्ण सहकार्य करत राहील. ग्राहकांच्या हितांचे संरक्षण करण्यासाठी बँक कटिबद्ध असून, यामध्ये गबन केलेल्या निधीची परतफेड देखील समाविष्ट आहे.
बेंगळुरू येथील एका स्थानिक न्यायालयाने रिलेशनशिप मॅनेजर नक्का किशोर कुमार (वय 40 वर्षे) याला न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. त्याच्यावर एका ग्राहकाची 2.7 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी गेल्या महिन्यात कुमारला अटक केली होती.
सूत्रांच्या माहितीनुसार, ही फसवणूक करण्याची पद्धत सुमारे 15 वर्षांपूर्वी गुरुग्राममध्ये सिटीबँकेच्या वेल्थ मॅनेजमेंट युनिटमध्ये झालेल्या फसवणुकीसारखीच आहे.
फसवणूक कशी करण्यात आली?
स्टँडर्ड चार्टर्ड बँकेच्या प्राथमिक तपासात असे आढळून आले आहे की, नक्का किशोर कुमारने बनावट स्वाक्षऱ्या केल्या आणि RTGS प्रणालीद्वारे FD तयार करण्यासाठी वापरायचे असलेले पैसे इतरत्र वळवले.
ग्राहकाने एफडी तयार करण्यासाठी 2 कोटी रुपये, 50 लाख रुपये आणि 25 लाख रुपयांचे चेक दिले होते. मात्र हे पैसे त्यांच्या मूळ उद्देशासाठी न वापरता तृतीय पक्षाकडे वळवण्यात आले.
यानंतर पाच इतर व्यक्तींनीही नक्का किशोर कुमार आणि स्टँडर्ड चार्टर्ड बँकेविरोधात अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, बडतर्फ करण्यात आलेल्या अधिकाऱ्याने ग्राहकांकडून चेक स्वीकारल्यानंतर बनावट फिक्स्ड डिपॉझिट बाँड्स जारी केले होते. त्यामुळे तपास यंत्रणा आता अधिकाधिक पीडित ग्राहकांची ओळख पटवण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधत आहेत.
