सध्याच्या काळात देशभरात स्टार्टअप कल्चर खोलवर रुजताना दिसत आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून उद्योग क्षेत्रात यशस्वी होत असलेल्या अनेक व्यक्तींच्या यशोगाथा आपण रोजच ऐकत, वाचत असतो. परंतु, असे अनेक यशस्वी भारतीय उद्योजपती आहेत ज्यांनी स्टार्टअपचे युग सुरू होण्यापूर्वी या क्षेत्रात प्रवेश केला आणि कठोर परिश्रम, चिकाटीच्या जोरावर यश मिळवले. राजेश मेहता हे अशा उद्योगपतींपैकी एक होय. ते एकेकाळी दुकानात जाऊन सोन्याचे दागिने विकायचे. पण आता ते भारतातील आघाडीचे सोन्याचे निर्यातदार बनले आहेत. राजेश यांनी फक्त 10,000 रुपये गुंतवून सोन्याचा व्यवसाय सुरू केला. आता त्यांच्या व्यवसायाचं साम्राज्य 13,800 कोटी रुपयांचे आहे.
advertisement
राजेश हे राजेश एक्सपोर्ट्स कंपनीचे मालक आणि कार्यकारी अध्यक्ष आहेत. ही कंपनी सोन्याची उत्पादनं बनवते आणि त्यांची निर्यात करते. या उत्पादनांमध्ये सोन्याचे दागिने, पदकं आणि नाण्यांचा समावेश आहे. कंपनीच्या उत्पादन युनिटची प्रतिवर्षी 400 टन सोन्याची उत्पादनं तयार करण्याची क्षमता आहे. यात उत्कृष्ट साधे आणि जडलेले दागिने, पदकं आणि नाण्यांचा समावेश आहे. राजेश मेहता यांनी बेंगळुरू, चेन्नई आणि हैदराबाद येथे व्यवसायाचा विस्तार केला आहे. राजेश यांच्या आयुष्यात 1989 मध्ये एक टर्निंग पॉईंट आला. यावेळी त्यांनी सोन्याच्या दागिन्यांच्या व्यवसायात प्रवेश केला. बेंगळुरूतील त्यांच्या एका छोट्या गॅरेजमध्ये त्यांनी सोन्याचे दागिने उत्पादन युनिट सुरू केलं. या युनिटमध्ये त्यांनी मालाची निर्मिती करून ब्रिटन, दुबई, ओमान, कुवेत, अमेरिका आणि युरोपमध्ये त्याची निर्यात केली.
खरं तर लहानपणी राजेश मेहता यांचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न होतं; पण नियतीने त्यांच्यासाठी काही वेगळंच नियोजन केलं होतं. राजेश हे मूळचे गुजरातचे असले तरी त्यांनी बंगळुरू येथे शिक्षण घेतलं. त्यांचे वडील जसवंतरी मेहता कर्नाटकात दागिन्यांच्या व्यवसायासाठी आले होते. शिक्षणादरम्यान वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी राजेश यांनी आपला कौटुंबिक व्यवसाय पुढे नेण्यासाठी वडील आणि मोठ्या भावासोबत काम करण्यास सुरूवात केली.
राजेश यांना व्यवसाय आणखी वाढवायचा होता. या उद्देशाने त्यांनी भावाकडून दोन हजार रुपयांचं कर्ज घेतलं. बँकेकडून आठ हजार रुपयांचं कर्ज मिळवलं. 1982 मध्ये मेहता यांनी कर्जाच्या रकमेतून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला राजेश चेन्नईतून दागिने आणून ते गुजरातमधील राजकोटमध्ये विकायचे. सुरुवातीला त्यांनी हे काम अल्प प्रमाणात केले. या कामात त्यांना यश मिळू लागल्यावर त्यांनी गुजरातमधील घाऊक विक्रेत्यांना दागिने विकण्यास सुरुवात केली. 1989 मध्ये स्वतःचे छोटे युनिट सुरू करून दागिन्यांचा व्यवसाय वाढवला. आज ते सोन्याच्या दागिन्यांचे प्रमुख निर्यातदार बनले आहेत. त्यांचा हा प्रवास अन्य व्यावसायिकांसाठी प्रेरणादायी असाच आहे.