शिक्षणाची ओढ, पण परिस्थितीचा अडसर
मोना नरोटे हिला शिक्षणाची प्रचंड आवड होती, मात्र घरची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने तिला केवळ 12 वी पर्यंतच शिक्षण घेता आले. चार बहिणींची जबाबदारी आणि वडिलांची ओढाताण पाहून मोनाने लहानपणापासूनच त्यांना कामात मदत करण्यास सुरुवात केली होती. घराला हातभार लागावा म्हणून तिने काही काळ खासगी नोकरीही केली, मात्र कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे तिला त्यात सातत्य ठेवता आले नाही.
advertisement
संघर्षातून उभा राहिला व्यवसाय
लग्नानंतर मुलाची जबाबदारी अंगावर असतानाही, वडिलांचे कष्ट तिला स्वस्थ बसू देत नव्हते. वडिलांच्या डोक्यावर असलेले कर्ज आणि तारण ठेवलेले घर सोडवणे हेच तिचे मुख्य ध्येय होते. अखेर तिने आपल्या चुलत बहिणीला सोबत घेतले आणि वडिलांचा पारंपरिक कुल्फी विक्रीचा व्यवसाय नव्या जोमाने सुरू केला.
जय हरी मसाला दूध सेंटरची ओळख
सध्या नाशिकमध्ये कडाक्याची थंडी वाजत आहे. या संधीचे सोने करत मोनाने आपल्या केंद्रावर केशर मसाला दूध विक्रीला सुरुवात केली आहे. तिच्या हाताची चव आणि प्रामाणिक कष्ट यामुळे अल्पावधीतच 'जय हरी मसाला दूध सेंटर' नाशिककरांच्या पसंतीस उतरले आहे. या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यातून ती आता वडिलांच्या खांद्याला खांदा लावून कर्जाचा भार हलका करत आहे.
वडिलांचे ओझे कमी करणे हेच माझे पहिले कर्तव्य होते. आज जेव्हा मी त्यांना तारण ठेवलेले घर सोडवण्यासाठी मदत करते, तेव्हा त्यांच्या डोळ्यातील समाधान हेच माझ्या कष्टाचे फळ आहे, मिळत असल्याचे मोना सांगत असते. केवळ नशिबाला दोष न देता, उपलब्ध साधनसामग्रीतून कष्टाची तयारी ठेवली तर यश नक्की मिळते, हेच मोनाने सिद्ध केले आहे.