नाशिक: सध्याच्या काळात उच्च शिक्षणानंतरही बेरोजगारीची समस्या मोठी आहे. परंतु, अनेक तरुण नोकरीच्या मागे न लागता स्वत:च्या व्यवसायातून एक वेगळी ओळख निर्माण करतात. नाशिकमधील उच्चशिक्षत बहीण-भावाची अशीच काहीशी कहाणी असून त्यांनी स्वत:चा फूड ट्रक सुरू केलाय. बहिणीचं एमबीएचं शिक्षण झालं असून भावानं हॉटेल मॅनेजमेंट केलंय. याबाबतच लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
advertisement
निशा जाधव आणि भूषण जाधव हे नाशिकमधील बहीण-भाऊ आहेत. घरची परिस्थिती बेताची असतानाही आई-वडिलांनी दोघांनाही उच्चशिक्षण दिलं. निशानं एमबीएचं शिक्षण घेतलं आणि घरात मोठी असल्याने घरची जबाबदारी घेण्यासाठी नोकरीचा शोध सुरू केला. परंतु, शिक्षणास साजेशा पगाराची नोकरी मिळत नव्हती. तेव्हा 12 वीचं शिक्षण घेतलेला लहान भाऊ भूषण देखील छोटी-मोठी नोकरी करून तिला मदत करत होता.
फूड ट्रक सुरू करण्याचा निर्णय
निशाचं याच काळात लग्न झालं आणि तिला एक मुलगी देखील झाली. त्यामुळं नोकरी करून घर सांभाळणं तिला शक्य होईना. तेव्हा हॉटेल मॅनेजमेंट करणारा लहान भाऊ भूषण यानं तिला फूड ट्रक सुरू करण्याचा सल्ला दिला. दोघा भावंडांनी मिळून नाशिकमधील गोविंदनगर परिसरात 4 महिन्यांपूर्वी ‘द फूड फॅन्टसी’ नावाचा छोटा फास्ट फूडचा ट्रक सुरू केला. आता या व्यवसायातून ते दोघेजण चांगली कमाई करत आहेत.
फास्ट फूड खाण्यासाठी गर्दी
निशाने दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा भावाचा सल्ला ऐकून फूड ट्रक सुरू केला. त्यामुळे तिला बाळासाठी वेळ मिळू लागला. तसेच भावालाही पैसे मिळवण्यासाठी मदत होऊ लागली. भूषण आणि निशा हे स्वतः आपल्या हाताने पुरेपूर हैजिनचा वापर करून विविध पदार्थ बनवत असतात. त्यांचा कडे फ्राइस, मोमोज, पिज़्ज़ा, बर्गर, चीझ बॉल, मोमोज पिज़्ज़ा असे पदार्थ मिळतात. त्यामुळे सायंकाळी त्यांच्या फूड ट्रकवर मोठी गर्दी असते. यातून त्यांची चांगली कमाई होत असल्याचंही निशा सांगते.