निलेश भांगे मूळचा बीड जिल्ह्यातील आहे. उच्च शिक्षणासाठी तो पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात (एफ. सी. कॉलेज) बी.एस्सी. शिक्षणासाठी आला. शिक्षणासाठी घरून पैसे न घेता स्वतः काहीतरी करून उभं राहायचं, असा त्याचा निर्धार होता. त्यामुळे कॉलेज करत असतानाच त्याने पार्टटाईम सिक्युरिटी गार्डची नोकरी स्वीकारली. मात्र या नोकरीमुळे कॉलेजचे प्रॅक्टिकल्स आणि अभ्यासावर परिणाम होऊ लागला. अखेर शिक्षणाला प्राधान्य देत त्याने ती नोकरी सोडण्याचा कठोर निर्णय घेतला.
advertisement
घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. तीन बहिणींच्या लग्नामुळे कुटुंबावर कर्जाचा डोंगर होता. बारावीच्या शिक्षणासाठी सावकाराकडून घेतलेले कर्जही फेडायचे होते. आई-वडील, भाऊ-वहिनी हे सगळे कुटुंबीय ऊसतोडीसाठी कर्नाटकात स्थलांतर करत असत. अशा परिस्थितीत पुण्यात राहून शिक्षण घेणे आणि घराला आर्थिक मदत करणे हे मोठं आव्हान होतं. त्यामुळे निलेशने स्वतःचा खर्च स्वतः भागवण्याचा आणि काहीतरी व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला.
याच काळात त्याने कॉलेजबाहेर चहा विकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला चहा बनवण्याचंही त्याला नीट ज्ञान नव्हतं. मात्र ग्राहकांच्या सूचना, अनुभव आणि सतत प्रयोग करत करत त्याने चहाची चव सुधारली. हळूहळू त्याच्या चहाला पसंती मिळू लागली. मेहनत, प्रामाणिकपणा आणि सातत्य याच्या जोरावर त्याने 2021 मध्ये एफ. सी. चाय कट्टा या नावाने चहाचा व्यवसाय अधिकृतपणे सुरू केला.
व्यवसाय वाढत गेल्यावर निलेशने पुढचं पाऊल उचलत काही महिन्यांपूर्वी एफ. सी. रोडवर स्वतःचं रेस्टॉरंट सुरू केलं. आई-वडिलांच्या नावावरून त्याने या रेस्टॉरंटला इंदुनाथ असं नाव दिलं. 2024 मध्ये सुरू झालेल्या या रेस्टॉरंटलाही ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
आज निलेश भांगेच्या एफ. सी. चाय कट्टा आणि इंदुनाथ या दोन व्यवसायांची वार्षिक उलाढाल सुमारे 70 ते 80 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या व्यवसायातून सध्या 15 जणांना रोजगार मिळत आहे. विशेष म्हणजे, व्यवसाय सांभाळत असतानाच निलेश आपलं पुढील शिक्षणही सुरू ठेवत आहे.
चहा विक्रीपासून कॅफे मालकापर्यंतचा निलेश भांगेचा हा प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मेहनत, चिकाटी आणि सकारात्मक विचारांच्या जोरावर यश नक्कीच मिळवता येतं, हेच त्याने आपल्या आयुष्यातून दाखवून दिलं आहे.