शासनाने रेशन कार्डधारकांसाठी अनिवार्य केलेली 'ई-केवायसी' (e-KYC) प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत ३० जून २०२५ रोजी दिली होती ही मुदत संपल्याने आता ज्यांनी KYC केलं नाही त्यांचं नाव रेशन कार्डवरुन वगळण्यात येणार आहे. यामुळे अनेक लाभार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे जर ई-केवायसी केली नसेल तर आता रेशन कार्ड रद्द होणार का? आणि यापुढे शिधावाटप मिळणार की नाही?
advertisement
जिल्ह्यात अजूनही २.२२ लाख लाभार्थ्यांची ई-केवायसी बाकी
अकोला जिल्ह्यात एकूण ४ लाख ७७ हजार शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांपैकी फक्त २ लाख ७७ हजार लोकांनीच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित २ लाख २२ हजार २०३ लाभार्थ्यांची केवायसी अजूनही बाकी आहे. यामुळे आता रेशन दुकानांवर आणि स्थानिक प्रशासनावर जबाबदारी आली आहे की त्यांनी तातडीने अहवाल सादर करावा.
अहवाल सादरीकरणाची अंतिम मुदत
शासनाच्या निर्देशानुसार, रेशन दुकानदारांनी ५ जुलैपर्यंत ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांची यादी जिल्हा पुरवठा विभागाकडे सादर करावी लागणार आहे. त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी आणि दुकानदारांकडून माहिती संकलन सुरू आहे.
रेशन बंद होईल का?
जर ई-केवायसी केली नसेल तर लाभार्थ्याचे नाव सरकारी योजनांच्या यादीतून वगळले जाऊ शकते. अशा लाभार्थ्यांना रेशन मिळणार नाही. तसेच अन्न सुरक्षा योजना, अंत्योदय योजना आणि इतर सरकारी लाभांपासून ते वंचित राहू शकतात. त्याचं नाव रेशन कार्डमधून वगळलं जाऊ शकतं.
आता करायचं काय?
ज्यांनी ई-केवायसी अद्याप केली नाही, त्यांनी तात्काळ जवळच्या सेवा केंद्रात किंवा रेशन दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. केवायसी करताना आधार क्रमांक, अंगठा किंवा बायोमेट्रिक आणि मोबाइल क्रमांक लागतो.
अधिकाऱ्यांचा स्पष्ट इशारा
जिल्हा पुरवठा अधिकारी रवींद्र येवले यांनी स्पष्ट केले आहे की, ज्या लाभार्थ्यांनी स्वतःहून केवायसी पूर्ण केली नाही, त्यांची नावे थेट यादीतून वगळली जातील. आता ज्यांची नावं वगळण्यात आली आहेत किंवा रेशन कार्ड रद्द करण्यात आलं आहे त्यांना पुन्हा अर्ज प्रक्रिया करावी लागणार आहे. पुन्हा सगळी कागदपत्र सादर करावी लागणार आहेत. त्यानंतरच त्यांचं नाव रेशन कार्डवर जोडलं जाईल.