कोणती आहे ही कंपनी, ज्यामुळे वाढलं गुंतवणूकदारांचं टेन्शन
जेनसोल इंजिनिअरिंग लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे. या कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांमध्ये मोठी खळबळ उडवली आहे. परिस्थिती इतकी वाईट आली की शेवटी कंपनीला ट्रेडिंग बंद करावं लागलं. शेवटचा व्यवहार 29 सप्टेंबर रोजी झाला, त्या दिवशी शेअर 5 टक्क्यांच्या लोअर सर्किटवर येऊन 41.05 रुपयांवर बंद झाला होता. विशेष म्हणजे, रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रातील एकेकाळी अग्रगण्य असलेल्या या कंपनीच्या शेअरची किंमत या वर्षात आतापर्यंत 95 टक्क्यांनी कोसळली. त्यामुळे कंपनी मोठं आर्थिक नुकसान झालं.
advertisement
2400 रुपयांवर जाऊन जोरात आपटला शेअर
या शेअरने गुंतवणूकदारांचे मोठं नुकसान केलं. या वर्षाच्या सुरुवातीला जो शेअर 772 रुपयांच्या पातळीवर होता, त्याची किंमत आता 41 रुपयांवर आली आहे. गेल्या सहा महिन्यांत यात 75 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. याहून धक्कादायक बाब म्हणजे, ऑक्टोबर 2023 मध्ये या शेअरचा भाव 2400 च्या आसपास होता. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की, सर्वोच्च पातळीवरून हा शेअर आत्तापर्यंत तब्बल 99 टक्क्यांहून अधिक तुटला आहे.
संचालकांचे राजीनामे ठरले मोठी अडचण
या मोठ्या घसरणीमागे अनेक गंभीर कारणे आहेत. यामध्ये नियामक तपासणी कंपनीच्या संचालकांचे राजीनामे, वाढलेले कर्जाचे ओझे आणि इतर आर्थिक अनिश्चितता यांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, कंपनीने एका बाजूला सोलर ईपीसी (EPC - अभियांत्रिकी, खरेदी आणि बांधकाम) प्रकल्पांमधून आर्थिक वर्ष 2024 मध्ये 960 कोटींचा महसूल नोंदवला, जो मागील वर्षापेक्षा 141% अधिक होता; पण दुसऱ्या बाजूला तिला अनेक मोठ्या आरोपांचा सामना करावा लागला.
सेबीची कारवाई
कंपनीतील नियमभंगावर बाजार नियामक SEBI ने कठोर कारवाई केली आहे. SEBI ने कंपनीचे प्रमोटर्स अनमोल सिंह जग्गी आणि पुनीत सिंह जग्गी यांना 'निधीचा गैरवापर' आणि शासन व्यवस्थेतील त्रुटींसाठी सिक्युरिटीज मार्केटमध्ये भाग घेण्यापासून रोखले आहे. तसेच, त्यांचे संचालक पदही निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय, इरेडा सारख्या संस्थात्मक वित्त एजन्सींनी थकीत कर्जामुळे कंपनीविरुद्ध दिवाळखोरी प्रक्रिया देखील सुरू केली आहे.
कंपनीला पुन्हा विश्वास संपादन करावा लागणार
जेनसोल इंजिनिअरिंग लिमिटेड ही सोलर ऊर्जा प्रकल्पांसाठी ईपीसी सेवा देणारी एक प्रमुख कंपनी आहे, जी मोठ्या प्रमाणात सोलर प्लांट्सचे डिझाइन, इन्स्टॉलेशन आणि व्यवस्थापन करते. कंपनीची सुरुवातीची वाढ वेगवान असली तरी, सध्याची परिस्थिती पाहता कंपनीला आपला विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी कायदेशीर, आर्थिक बाबींमध्ये दुरुस्ती करणं अत्यावश्यक आहे नाहीतर या कंपनीचं आणि गुंतवणूकदारांचं काही खरं नाही हे नक्की.