गेल्या काही दिवसांत शेअर मार्केटमध्ये तेजी दिसत आहे. त्यामुळे काही शेअर्स वधारले आहेत. बातम्यांमुळेदेखील काही शेअर्समध्ये वाढ पाहायला मिळत आहे.
महानगर टेलिफोन निगम लिमिटेड अर्थात एमटीएनएलच्या शेअर्समध्ये मंगळवारी 5 टक्क्यांपर्यंत वाढ झाली. बीएसएनएलसोबत झालेल्या करारानंतर टेलिकॉम सेक्टरमधला हा पेनी स्टॉक वधारला आणि त्याच्या शेअरची किंमत 49.60 रुपयांच्या पातळीवर पोहोचली. या कंपनीचं मार्केट कॅप 3.12 हजार कोटी रुपये आहे. या कराराचा परिणाम शेअरच्या किमतीवर आणखी होऊ शकतो.
advertisement
एमटीएनएल हा सार्वजनिक क्षेत्रातला एक उपक्रम असून, 1986मध्ये त्याची स्थापना झाली. दिल्ली आणि मुंबईतल्या रहिवाशांना परवडणाऱ्या दरात उच्च दर्जाची दूरसंचार सेवा देण्यासाठी एमटीएनएलची स्थापना करण्यात आली. 1997मध्ये अर्थव्यवस्थेतल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल एमटीएनएलला नवरत्न दर्जा मिळाला आहे.
बीएसई स्मॉल कॅप निर्देशांकांतर्गत ही कंपनी येते. पाच वर्षांत कंपनीची स्टॉक प्राइस सीएजीआर 50 टक्के राहिला. हा शेअर त्याच्या 27.48 रुपये प्रति शेअर या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवरून 70 टक्क्यांहून अधिक वधारला आहे. गेल्या वर्षभरात या शेअरने गुंतवणूकदारांना 80 टक्क्यांपर्यंत रिटर्न दिला. गेल्या महिनाभरापासून हा शेअर सपाट असला, तरी गेल्या सहा महिन्यांत तो 30 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. त्याची 52 आठवड्यातली उच्चांकी पातळी 101 रुपये आहे.
दरम्यान, महानगर टेलिफोन निगम लिमिटेडला बीएसएनएलशी करार करण्यासाठी 14 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या त्यांच्या 360व्या बोर्डाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालय अर्थात एमसीएने तपासलेला हा करार दोन दूरसंचार सेवेतल्या दिग्गज कंपन्यांमधली सहयोगी भागीदारी वाढवण्याकरिता डिझाइन केलेला आहे. हा करार दहा वर्षं कालावधीकरिता असेल. बोर्डाच्या मंजुरीनंतर एमटीएनएल आणि बीएसएनएलने 22 नोव्हेंबर 2024 रोजी सेवा करार यशस्वीरीत्या अंमलात आणला. हा कायदेशीर बंधनकारक करार 1 जानेवारी 2025 पासून अधिकृत लागू असेल. त्याचा कालावधी दहा वर्षांचा आहे. दोन्ही कंपन्यांना सहा महिन्यांच्या नोटिशीसह करार संपुष्टात आणण्याची किंवा परस्पर संमतीने त्याची मुदत वाढवण्याची मुभा असेल. या करारामुळे मंगळवारी एमटीएनएलच्या शेअरमध्ये वाढ दिसून आली.