Agriculture News : कमी खर्चात करा एरंडी शेती, मिळेल पैसाच पैसा, कशी कराल लागवड? Video
- Reported by:Prachi Balu Kedari
- Published by:Mohan Najan
Last Updated:
एरंडीची शेती सध्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. कमी पाणी, कमी व्यवस्थापन आणि निश्चित बाजारपेठ यामुळे एरंडी पिकाकडे विदर्भ आणि मराठवाडा भागातील शेतकऱ्यांचा कल वाढताना पाहायला मिळतो.
पुणे : शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी पारंपरिक पिकांबरोबरच कमी कालावधीत जास्त नफा देणाऱ्या पिकांकडे वळण्याचा कल वाढताना दिसत आहे. अशाच पिकांपैकी एरंडीची शेती सध्या शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. कमी पाणी, कमी व्यवस्थापन आणि निश्चित बाजारपेठ यामुळे एरंडी पिकाकडे विदर्भ आणि मराठवाडा भागातील शेतकऱ्यांचा कल वाढताना पाहायला मिळतो.
एरंड हे झाड नैसर्गिकरित्या माळरानावरही उगवते. मात्र शास्त्रीय पद्धतीने लागवड केल्यास या पिकातून चांगले उत्पादन आणि भरघोस उत्पन्न मिळू शकते. साधारण 8852 चौरस फूट म्हणजेच एका एकर क्षेत्रात 4 × 2 फूट अंतरावर एरंडीची लागवड केली जाते. हे पीक सुमारे सहा महिन्यांत तयार होते. काढणी टप्प्याटप्प्याने होत असल्याने शेतकऱ्यांना एकाच वेळी मोठा खर्च किंवा मजुरीचा ताण येत नाही.
advertisement
योग्य खत व्यवस्थापन, वेळेवर तण नियंत्रण आणि आवश्यक ती निगा राखल्यास एकरी साधारण 15 ते 18 क्विंटल उत्पादन मिळू शकते. एरंडी पिकासाठी मल्चिंग पेपर बेडवर लागवड केल्यास तणांचा त्रास कमी होतो तसेच ओलावा टिकून राहण्यास मदत होते. यामुळे उत्पादनातही वाढ होते. एकरी साधारण 60 ते 70 हजार रुपये खर्च येतो, मात्र मिळणारे उत्पन्न पाहता हा खर्च सहज वसूल होतो.
advertisement
एरंडीचा बाजारभाव सध्या एक क्विंटलमागे साधारण सहा हजार रुपये आहे. त्या तुलनेत एकरी उत्पादन गृहीत धरल्यास शेतकऱ्यांना चांगला आर्थिक फायदा मिळतो. पुणे मार्केट यार्ड, छत्रपती संभाजीनगर, जालना यांसारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये एरंडीची सहज विक्री होते. त्यामुळे बाजाराच्या दृष्टीनेही शेतकऱ्यांना फारशी अडचण भासत नाही.
कॉस्मेटिक उद्योग, औषधे, एरंडीचे तेल, साबण तसेच विविध औद्योगिक उपयोगांसाठी एरंडीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे या पिकाला बाजारात सातत्याने मागणी असते. कमी पाण्यात हे पीक घेता येत असल्याने दुष्काळी किंवा कमी पावसाच्या भागातही एरंडीची शेती फायदेशीर ठरते.
advertisement
रोग व्यवस्थापनाच्या दृष्टीने पाहिले असता वर्षातून केवळ दोन ते तीन वेळा करपा रोगावर फवारणी करावी लागते. त्यामुळे इतर पिकांच्या तुलनेत एरंडी पिकामध्ये व्यवस्थापन खर्च आणि मेहनत कमी लागते. काढणी साधारण साडेचार महिन्यांच्या कालावधीत तीन टप्प्यांत होते.
ही माहिती शेतकरी श्रीनिक पाटील यांनी दिली असून त्यांच्या मते, कमी खर्चात अधिक नफा देणारी एरंडीची शेती ही भविष्यात शेतकऱ्यांसाठी एक चांगला पर्याय ठरू शकते. योग्य मार्गदर्शन आणि नियोजन केल्यास एरंडी पीक शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सकारात्मक बदल घडवू शकते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 4:31 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News : कमी खर्चात करा एरंडी शेती, मिळेल पैसाच पैसा, कशी कराल लागवड? Video









