निफ्टी 50 मध्ये समाविष्ट होण्याचे निकष काय आहेत?
नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) हे निफ्टी 50 मध्ये समाविष्ट होणाऱ्या कंपन्यांची निवड काही ठराविक निकषांवर करते. यामध्ये प्रमुखतः कंपनीचे शेअर बाजारातील कामगिरी आणि ‘फ्री फ्लोट मार्केट कॅपिटलायझेशन’ विचारात घेतले जाते.
फ्री फ्लोट मार्केट कॅप म्हणजे काय?
मनी कंट्रोलनं दिलेल्या वृत्तानुसार, फ्री फ्लोट मार्केट कॅप म्हणजे एखाद्या कंपनीच्या एकूण बाजारमूल्यापैकी गुंतवणूकदारांसाठी खुले असलेले शेअर्स. म्हणजेच, प्रमोटर्सकडील होल्डिंग वगळून बाजारात व्यवहारासाठी उपलब्ध असलेल्या शेअर्सची किंमत. उदाहरणार्थ, जर स्टॉक A चे एकूण मार्केट कॅप ₹1,00,000 कोटी असेल आणि प्रमोटर्सकडे 50% शेअर्स असतील, तर त्याचा फ्री फ्लोट मार्केट कॅप ₹50,000 कोटी असेल.
advertisement
स्टॉक B चे एकूण मार्केट कॅप ₹80,000 कोटी आणि प्रमोटर्सकडे फक्त 30% शेअर्स असतील, तर त्याचा फ्री फ्लोट मार्केट कॅप ₹56,000 कोटी असेल. या गणनेनुसार, जरी स्टॉक A चे मार्केट कॅप जास्त असले तरी, स्टॉक B चा फ्री फ्लोट मार्केट कॅप अधिक असल्याने त्याला निफ्टीमध्ये स्थान मिळू शकते.
ब्रिटानिया आणि BPCL ला निफ्टीमधून बाहेरचा रस्ता?
ब्रोकरेज कंपन्यांच्या मते, झोमॅटो आणि जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस यांना निफ्टी 50 मध्ये समाविष्ट करण्यासाठी ब्रिटानिया इंडस्ट्रीज आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) यांना निफ्टीमधून बाहेर काढले जाऊ शकते. जर असे झाले, तर ब्रिटानिया आणि BPCL साठी मोठा आर्थिक धक्का असेल.
गुंतवणुकीवर होणारा परिणाम
ब्रोकरेज फर्म JM Financial च्या अहवालानुसार, झोमॅटोमध्ये ₹5300 कोटींची नवीन गुंतवणूक होऊ शकते. जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 3000 रुपये कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. दुसरीकडे, BPCL आणि ब्रिटानिया यांच्या शेअर्समधून मोठी रक्कम बाहेर पडण्याची शक्यता आहे. निफ्टी 50 शेअर्समध्ये दोनवेळा बदल केले जातात. सप्टेंबर आणि मार्च महिन्यात निफ्टी 50 मध्ये कंपन्या लिस्ट होतात.
फेब्रुवारी ते जुलै या काळातील डेटा लक्षात घेऊन सप्टेंबरमध्ये बदल केला जातो. ऑगस्ट ते जानेवारी या काळातील परफॉर्मन्स पाहून मार्चमध्ये सुधारणा केली जाते. निफ्टी 50 मध्ये शेअर्स समाविष्ट होण्याचे फायदे काय आहेत ते समजून घेऊया.
गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास: निफ्टी 50 मध्ये असलेल्या कंपन्यांमध्ये मोठ्या गुंतवणूकदारांची रस्सीखेच असते.
म्युच्युअल फंड आणि ETF गुंतवणूक वाढते: मोठ्या गुंतवणूकदारांसोबत अनेक म्युच्युअल फंड्स आणि एक्स्चेंज ट्रेडेड फंड्स (ETFs) या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात.
शेअरच्या लिक्विडिटीमध्ये वाढ: निफ्टीमध्ये असलेल्या कंपन्यांचे शेअर्स अधिक तरल होतात, म्हणजेच त्यांची विक्री आणि खरेदी सहज होऊ शकते.
पुढील बदल कधी होणार?
निफ्टी 50 मध्ये नवीन कंपन्यांची अधिकृत घोषणा फेब्रुवारी 2025 मध्ये होईल.31 मार्च 2025 पासून नवे बदल लागू होणार आहेत. निफ्टी 50 मध्ये झोमॅटो आणि जिओ फायनान्शियल समाविष्ट होणे हा भारतीय शेअर बाजारासाठी एक मोठा टप्पा ठरेल. यामुळे या कंपन्यांच्या गुंतवणूकदारांना फायदा होण्याची शक्यता आहे. मात्र, ब्रिटानिया आणि BPCL यांना मोठे नुकसान होऊ शकते. शेअर बाजाराच्या गुंतवणूकदारांसाठी ही एक महत्त्वाची घडामोड आहे.