गेल्या काही काळापासून रिलायन्स पॉवर सात्याने मोठ्या घोषणा केल्या आहेत. त्यात आता आणखी एका घोषणेची भर पडली आहे. कंपनीच्या बोर्ड मेंबर्सनी गुरुवारी बाँड जारी करून 500 मिलियन अमेरिकन डॉलर्स (सुमारे 4,198 कोटी) उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. याशिवाय, कंपनीच्या रेग्युलेटरी फायलिंगनुसार, बोर्डाने कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी स्टॉक ऑप्शन स्कीम (ईएसओएस) मंजूर केली आहे.
advertisement
अनिल अंबानींच्या नेतृत्वाखालील रिलायन्स समूहाने गेल्या बुधवारी भूतानमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती. कंपनीच्या निवेदनानुसार, भूतानमध्ये 1,270 मेगावॅट क्षमतेचा सौर आणि जलविद्युत प्रकल्प उभारला जाणार आहे. यापूर्वी, रिलायन्स पॉवरची उपकंपनी असलेल्या रोझा पॉवरने सिंगापूरस्थित कर्जदार वर्डे पार्टनर्सकडून घेतलेल्या 850 कोटी रुपयांच्या कर्जाची मुदतपूर्व परतफेड केल्याची घोषणा केली होती. त्यामुळे रोझा पॉवर आता कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आहे.
रिलायन्स पॉवर लिमिटेडची उपकंपनी असलेल्या विदर्भ इंडस्ट्रीज पॉवरसाठी गॅरेंटरशी संबंधित 3,872 कोटी रुपयांच्या देणेदारीची पूर्तता झाली आहे. कंपनीने सांगितलं की, कॉर्पोरेट गॅरंटी, संमती आणि व्हीआयपीएलच्या थकबाकी कर्जाच्या संदर्भात त्यांनी एकूण 3,872.04 कोटी रुपयांचं दायित्व आणि दावे निकाली काढले आहेत. याशिवाय कंपनीला गेल्या महिन्यात लिलावाद्वारे 500 मेगावॅट बॅटरी स्टोरेजची ऑर्डर मिळाली होती. हा लिलाव सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (सेकी) आयोजित केला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रिलायन्स पॉवरच्या संचालक मंडळाने पाच टक्के वार्षिक व्याजाने 500 मिलियन डॉलर्स उभारण्याच्या योजनेला मंजुरी दिली आहे. असुरक्षित विदेशी चलन परिवर्तनीय बाँडद्वारे 10 वर्षांच्या कालावधीसह पाच टक्के व्याजाने ही रक्कम उभारली जाईल.
रिलायन्स ग्रुपचं युनिट असलेल्या रिलायन्स पॉवरने सांगितलं की, हे बाँड वर्डे इन्व्हेस्टमेंट पार्टनर्सच्या सहयोगींना दिले जातील. ही एक जागतिक पर्यायी गुंतवणूक कंपनी आहे. सर्व कर्मचाऱ्यांना 1,180 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे 22 कोटी इक्विटी शेअर्स मंजूर करण्यासाठी संचालक मंडळाने एम्प्लॉई शेअर ऑप्शन स्कीम (ईएसओएस) मंजूर केली आहे. कंपनीतील भागधारकांच्या मंजुरीच्या आणि इतर नियामक मंजुरीवर ईएसओएस अवलंबून असेल. कंपनीने देशात एकूण 5,340 मेगावॅट क्षमतेचे प्लँट उभारले आहेत. यामध्ये मध्य प्रदेशातील सासन येथील 4000 मेगावॅट क्षमतेच्या मोठ्या ऊर्जा प्रकल्पाचा समावेश आहे.