शेअर मार्केटमध्ये सातत्यानं आयपीओ लिस्ट होत आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अधिक कंपन्यांनी शेअर मार्केटमध्ये प्रवेश केलाय. आता नीलम लिनन अँड गारमेंट्स (इंडिया) लिमिटेड ही एक सॉफ्ट होम फर्निशिंग कंपनी 8 नोव्हेंबर 2024 ला आयपीओ घेऊन येत असून, ज्याची किंमत केवळ 24 रुपये आहे. कंपनीचा इश्यु 12 नोव्हेंबर 2024 ला बंद होईल.
advertisement
कंपनीने त्यांच्या आयपीओसाठी 20 ते 24 रुपये प्राईज बँड निश्चित केलाय. या माध्यमातून कंपनी 13 कोटी रुपये उभारण्याची तयारीत आहे. ज्यासाठी कंपनीनं आयपीओद्वारे 54.18 लाख इक्विटी शेअर्सचे नवीन इश्यु जारी करेल. यामध्ये ऑफर फॉर सेल सुविधा नसेल. याचा अर्थ कोणताही प्रमोटर त्याच्याकडील शेअर्स विकू शकणार नाही.
कंपनीचं नेमकं काम काय?
नीलम लिनन अँड गारमेंट्स (इंडिया) लिमिटेड ही टेक्सटाईल क्षेत्रातील छोटी कंपनी आहे. कंपनीचं मुख्यालय महाराष्ट्रात आहे. नीलम लिनन अँड गारमेंट्स आयपीओ ही एक सॉफ्ट होम फर्निशिंग फर्म आहे, जी अमेरिका, ऑस्ट्रेलियासारख्या देशांमध्ये जागतिक ग्राहकांना सेवा देते. ही कंपनी बेडशीट, ड्युव्हेट कव्हर्स, पिलो कव्हर्स, टॉवेल, शर्ट्स आणि सूट असे कपडे देखील तयार करून ते रिटेल स्टोअर्सना विकते.
कंपनीचा व्यवसाय दोन भागांत विभागला गेलाय. भिवंडी आणि ठाणे येथे कंपनीची युनिट आहेत. कंपनी त्यांची उत्पादने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय ग्राहकांना विकते. देशांतर्गत ग्राहकांमध्ये विजय सेल्स, ॲमेझॉन, मीशो आणि इमर्सन स्टोअर्सचा समावेश आहे. तर, आंतरराष्ट्रीय ग्राहकांमध्ये मंगळवार मॉर्निंग, टीजेएक्स, पॅम अमेरिका, ओशन स्टेट जॉब लॉट्स, लिनक्राफ्ट ऑस्ट्रेलिया, बिग लॉट्स, 99 सेंट्स आणि यू.एस.पोलो असोसिएशन आदींचा समावेश आहे. कंपनी सध्या दररोज 4000 सेट तयार करीत असून दररोज 6000 सेट तयार करण्याची कंपनीची क्षमता आहे.
किती गुंतवणूक करावी लागेल?
किरकोळ गुंतवणूकदारांना या आयपीओमध्ये पैसे गुंतवण्यासाठी कमीतकमी सहा हजार शेअर्स खरेदी करावे लागतील. याचा अर्थ असा की, 24 रुपयांच्या प्राइस बँडवर आधारित तुम्हाला एक लॉट खरेदी करण्यासाठी किमान 1 लाख 44 हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. तर, हाय नेटवर्थ असणाऱ्यांसाठी किमान दोन लॉट खरेदी करावे लागतील. म्हणजेच त्यांना 2 लाख 88 हजार रुपये गुंतवणूक करावी लागेल. आयपीओचा मुख्य हिस्सा पात्र संस्थात्मक खरेदीदारांसाठी राखीव आहे. तर, 15 टक्के गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि 35 टक्के रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखीव असेल. कंपनीच्या शेअर्सचं वाटप 13 नोव्हेंबर 2024 ला होईल. तर, कंपनीचा आयपीओ एनएसई आणि एसएमई प्लॅटफॉर्मवर 18 नोव्हेंबर 2024 ला लिस्ट होईल.
तुम्हीही शेअर मार्केटमध्ये दीर्घकाळ गुंतवणूक करण्याचा विचार करीत असाल, तर आयपीओ खरेदी करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अर्थात कोणत्या कंपनीचा आयपीओ खरेदी करावा, यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या.