मंगळवारी सुरुवातीच्या दहा मिनिटांत रेखा झुनझुनवाला यांची एकूण संपत्ती 105 कोटी रुपयांनी वाढली. हे 105 कोटी रुपये त्यांना केवळ 2 स्टॉक्समधून मिळाले. यात टायटन आणि मेट्रो ब्रँड्स या स्टॉक्सचा समावेश आहे. सुरुवातीच्या दहा मिनिटांत टायटनचे शेअर 20.90 रुपयांपर्यंत वाढले तर मेट्रो ब्रँड्सचे शेअर्स 3.90 रुपयांनी वधारले. एनएसईवर टायटनचे शेअर्स 3310 रुपयांनी उघडले आणि ते 3360 रुपयांपर्यंत पोहोचले. तसंच मेट्रो ब्रँड्सचे शेअर्स 1177 रुपयांवर खुले झाले आणि 10 मिनिटांत 1180.95 च्या इंट्रा डे उच्चांकावर पोहोचले.
advertisement
कसे झाले 105 कोटी रुपये?
टायटन कंपनीच्या जुलै ते सप्टेंबर 2024 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार, रेखा झुनझुनवाला यांच्याकडे कंपनीचे 4,57,13,470 शेअर्स आहेत. भारतीय शेअर बाजारात सुरुवातीच्या 10 मिनिटांत टायटनचे शेअर 20.90 रुपये प्रति शेअर वधारल्याने झुनझुनवाला यांची संपत्ती 95.54 कोटी रुपयांनी वाढली. तसंच मेट्रो ब्रँड्सच्या शेअर्समध्ये 3.90 रुपयांनी तेजी आली. या कंपनीचे त्यांच्याकडे 2,61,02,394 शेअर्स असून, शेअर वधारल्याने त्यांच्या संपत्तीत 10.18 कोटी रुपयांनी वाढ झाली. एकूणच टायटन आणि मेट्रो ब्रँड्सचे शेअर वधारल्याने सुरुवातीच्या दहा मिनिटांत त्यांची संपत्ती 105.72 कोटी रुपयांनी वाढली. वृत्त लिहीपर्यंत मेट्रो ब्रँड्सचा शेअर 1200 च्या पलीकडे पोहोचला होता.
38 दिवसांनंतर परतले एफआयआय
विदेशी गुंतवणूकदारांनी 26 सप्टेंबरनंतर जी विक्री सुरू केली होती, ती आता 25 नोव्हेंबरला थांबली. संपूर्ण ऑक्टोबरमध्ये एफआयआयने 1,14,445.89 कोटी रुपयांची विक्री केली. नोव्हेंबरमध्ये सातत्याने अनेक दिवस नेट सेलर राहिले. 25 नोव्हेंबर रोजी एफआयआयनी खरेदी केल्याचं दिसलं. त्यांनी सोमवारी 85,251.94 कोटी रुपयांच्या शेअर्सची खरेदी केली आणि 75,304.39 कोटी रुपयांचे शेअर्स विकले. त्यामुळे सुमारे 38 दिवसांनंतर एफएफआयने खरेदी सुरू केली आणि 9,947.55 कोटी रुपयांचे शेअर्स खरेदी केले. विदेशी गुंतवणूकदार परतल्याने बाजारात पुन्हा एकदा उत्साह दिसला.
