21 डिसेंबर रोजी जीएसटी कौन्सिलची बैठक होणार आहे. त्याआधी या सोमवारी (2 डिसेंबर) अशी एक बातमी आली, की सिगारेट आणि कोल्ड्रिंकसारख्या उत्पादनांवर सरकार 35 टक्के जीएसटी आकारण्याची शक्यता आहे. या उत्पादनांवर सध्या 28 टक्के जीएसटी आकारला जातो. म्हणजेच या उत्पादनांवरच्या जीएसटीत सात टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. या बातमीचा परिणाम झाल्यामुळे वरुण बेव्हरेजेस, आयटीसी लिमिटेड यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये आज घसरण नोंदवली गेली.
advertisement
पीटीआय या वृत्तसंस्थेने एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने असं वृत्त दिलं, की तंबाखू आणि त्याच्याशी संबंधित उत्पादनं, तसंच कोल्ड्रिंक आणि कार्बोनेटेड ड्रिंक्स अशा पदार्थांवर 35 टक्क्यांचा विशेष जीएसटी दर प्रस्तावित करण्यावर सहमती दर्शवली आहे. सरकारने जीएसटीसाठी चार स्लॅब निश्चित केलेले आहेत. 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के आणि 28 टक्के असे ते स्लॅब्ज आहेत. याचाच अर्थ असा, की जीएसटी परिषदेच्या बैठकीत 35 टक्क्यांच्या नव्या दरावर शिक्कामोर्तब झालं, तर हा दर लागू होण्याची ती पहिलीच वेळ असेल. दरम्यान, या बातमीचा परिणाम संबंधित अनेक कंपन्यांच्या शेअर्सवर झाल्याचं पाहायला मिळालं.
वरुण बेव्हरेजेसचे शेअर मंगळवारी आपल्या आधीच्या बंद भावापासून 5.2 टक्क्यांच्या घसरणीसह 600 रुपयांच्या पातळीवर खुले झाले. आज त्याने 598.80 रुपयांवर इंट्राडे लो लेव्हलची नोंद केली. आयटीसीचे शेअर्स सुमारे तीन टक्के घसरून 462.75 रुपयांच्या पातळीवर पोहोचले. त्या व्यतिरिक्त व्हीएसटी इंडस्ट्रीजचे शेअर्स सुमारे 2.3 टक्क्यांच्या घसरणीसह 318.30 रुपयांवर व्यवहार करत होते. गोल्डफ्रे फिलिप्सचे शेअर्स 3.2 टक्क्यांच्या घसरणीसह 5575.50 रुपयांवर व्यवहार करत होते.