सामान्य गुंतवणूकदार कधीकधी फार गोंधळात पडतात की, शेअर्सची किंमत कमी-जास्त कशी होते. बहुतांश वेळा शेअर्सची मागणी आणि पुरवठा यामुळे शेअर्सची किंमत कमी-जास्त होत असते. जेव्हा शेअरची मागणी वाढते तेव्हा त्याची किंमत वाढते आणि जेव्हा अनेक गुंतवणूकदार शेअर विकायला लागतात तेव्हा शेअरची किंमत कमी होऊ लागते.
कोणत्याही स्टॉक मार्केटमध्ये दोन प्रकारची सर्किट्स असतात. त्यांना अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणतात. हे सर्किट किती टक्क्यांवर लागू केलं जाईल, हे संबंधित एक्सचेंजकडून ठरवलं जातं.
advertisement
लोअर सर्किट म्हणजे काय?
अनेकदा कंपनीचे शेअर्स झपाट्याने घसरतात. अशा स्थितीत स्टॉक जास्त पडू नये म्हणून सर्किट लावलं जातं. अशा परिस्थितीत जर गुंतवणूकदारांनी अचानक एखाद्या कंपनीतील शेअर्स विकायला सुरुवात केली तर त्या शेअरचं मूल्य एका ठराविक मर्यादेपर्यंत कमी होऊन त्याचं ट्रेडिंग थांबतं. किंमत कमी होण्याच्या या मर्यादेला 'लोअर सर्किट' म्हणतात. लोअर सर्किटमध्ये तीन टप्पे असतात. शेअरच्या किमतीत 10 टक्के, 15 टक्के आणि 20 टक्के घट आल्यानंतर लोअर सर्किट लावलं जातं.
अप्पर सर्किट म्हणजे काय?
कधी कधी एखाद्या कंपनीत गुंतवणूकदारांना जास्त रस निर्माण होतो. परिणामी, त्या कंपनीच्या शेअरचा भाव गगनाला भिडू लागतो. अशा स्थितीत अप्पर सर्किटचा वापर केला जातो. शेअरची किंमत ठराविक मर्यादेपर्यंत पोहोचताच त्यात अप्पर सर्किट लागू केलं जातं आणि ट्रेडिंग थांबवलं जातं. अप्पर सर्किटमध्ये देखील तीन टप्पे आहेत. शेअरची किंमत 10 टक्के, 15 टक्के आणि 20 टक्क्यांनी वाढल्यानंतर अप्पर सर्किट लावलं जातं.
सर्किटची तरतूद केव्हा सुरू झाली?
स्टॉक मार्केटमध्ये 28 जून 2001 पासून अप्पर सर्किट आणि लोअर सर्किटचा वापर सुरु झाला. त्याच दिवशी मार्केट रेग्युलेटर सेबीने सर्किट ब्रेकरची व्यवस्था केली होती. ही प्रणाली 17 मे 2004 रोजी पहिल्यांदा वापरली गेली होती.