झोमॅटो कंपनीचा आयपीओ आला होता, या आयपीओने गुंतवणूकदारांना बंपर परतावा दिला होता. आता आणखी एका फूड डिलीव्हरी प्लॅटफॉर्मचा आयपीओ मार्केटमध्ये येणार आहे. झोमॅटोनंतर आता स्विगीदेखील आयपीओ आणत आहे. गुंतवणूकदार आता फूड आणि किराणा डिलिव्हरी कंपनी स्विगीच्या आयपीओची खूप आतुरतेने वाट पाहत आहेत. स्विगीच्या आयपीओबाबत एक मोठी अपडेट आली आहे. दिवाळीनंतर कंपनीचा आयपीओ गुंतवणुकीसाठी उघडेल. रिपोर्टनुसार, हा आयपीओ 6 नोव्हेंबर रोजी उघडेल आणि 8 नोव्हेंबरपर्यंत यात गुंतवणूक करण्याची संधी गुंतवणूकादारांना असेल.
advertisement
ब्लूमबर्गच्या रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने म्हटलं आहे की, अँकर गुंतवणूकदार 5 नोव्हेंबरला शेअर्ससाठी बोली लावू शकतील. कंपनीच्या शेअर्सचं लिस्टिंग 13 नोव्हेंबरला होऊ शकते. मात्र, कंपनीने अजून याबाबत कोणतेही अधिकृत माहिती दिलेली नाही.
अप्पर प्राईज बँड 390 होण्याची शक्यता
रिपोर्टनुसार, स्विगीच्या आयपीओची किंमत 371-390 रुपये प्रतिशेअर असू शकते. कंपनी आयपीओद्वारे 1.35 अब्ज डॉलर (सुमारे 11,700 कोटी) उभारण्याची योजना बनवत आहे.
व्हॅल्युएशन टार्गेटमध्ये कपात
स्विगीने नुकतेच त्यांचे आयपीओ व्हॅल्युएशन टार्गेट कमी करून 11.3 अब्ज डॉलर केले. ते 15 अब्ज डॉलरच्या सुरुवातीच्या टार्गेटपेक्षा हे 25 टक्के कमी आहे. स्विगीने गोपनीय ‘प्री-फायलिंग रुट’च्या माध्यमातून 30 एप्रिल रोजी कागदपत्रे दाखल केली होती.
कोणत्या कंपन्यांशी स्विगीची स्पर्धा
स्विगी आणि त्याचे क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्म इन्स्टामार्ट यांची स्पर्धा झोमॅटो, झोमॅटोचे ब्लिंकिट, झेप्टो आणि बिग बास्केट या कंपन्यांशी आहे. स्विगीचे मुख्य गुंतवणूकदार प्रॉसस (32 टक्के), सॉफ्टबँक (आठ टक्के) आणि एक्सेल (सहा टक्के), तर इतर भागीदारांमध्ये एलिव्हेशन कॅपिटल, डीएसटी ग्लोबल, टेनसेंट, कतार इन्व्हेस्टमेंट अथॉरिटी (क्यूआयए), जीआयसी सिंगापूर यांचा समावेश आहे.